मुंबई : दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार झहीर खान दुखापतीमुळे आयपीएलमधल्या उर्वरीत सामन्यांतूनच माघार घेण्याची चिन्हं आहेत. झहीरच्या गैरहजेरीत दिल्लीच्या नेतृत्त्वाची धुरा करूण नायरकडे सोपवण्यात आली आहे.

ईडनवर कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात झहीरच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे पंजाबविरुद्धच्या लढतीतही तो खेळू शकला नाही. 38 वर्षीय झहीरला त्याच्या याआधीच्या कारकीर्दीतही मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीने वारंवार सतावलं होतं.

दिल्ली डेअरडव्हिल्स सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत सर्वात तळाला आहे. दिल्लीच्या नावावर 8 सामन्यांमध्ये केवळ दोन विजय आहेत. तर सहा सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.

दिल्लीचे गोलंदाज झहीर खान, अमित मिश्रा, कॅगिसो रबाडा यांनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली असली तरी संजू सॅमसनचा अपवाद वगळता फलंदाज मात्र अपयशी ठरले आहेत.