DC Vs RR: विकेटकीपर कर्णधार असलेल्या दोन युवा कर्णधारांमध्ये आज आयपीएलचा मुकाबला होणार आहे. मागील सामने दोन्ही संघाने जिंकले असल्याने दोन्ही संघांना आत्मविश्वास वाढला आहे. आजचा सामना जिंकून प्ले ऑफमधील आपलं स्थान निश्चित करण्याचा ऋषभ पंतच्या दिल्लीचा प्रयत्न असेल तर दिल्लीला नमवून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेण्यासाठी संजू सॅमसनची राजस्थान टीम सज्ज आहे. दिल्ली 9 पैकी सात सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या नंबरवर आहे. आज जर त्यांनी राजस्थानला हरवलं तर ते पुन्हा नंबर वनवर जातील. शिवाय प्लेऑफमध्ये जागा मिळवणारा पहिला संघ देखील ठरेल.
दिल्लीच्या संघात एक मोठा बदल अपेक्षित
दिल्लीला हैदराबाद विरुद्ध खेळताना चांगलाच झटका लागला. हा सामना दिल्लीनं सहज जिंकला मात्र या सामन्यात स्टोयनिस जखमी झाला. त्यामुळं त्याची आज खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याच्या जागी स्मिथचं खेळणं जवळपास निश्चित आहे. राजस्थान रॉयल्स विरुध्दच्या आज खेळल्या जाणाऱ्या सामन्यात दिल्लीच्या संघात एक मोठा बदल अपेक्षित आहे. दुखापतग्रस्त झालेल्या मार्कस स्टोयनिसच्या जागी दिल्लीच्या संघात ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला संधी मिळू शकते. याशिवाय दिल्लीच्या संघात कुठलाही बदल अपेक्षित नाही. दिल्ली सध्या गुणतालिकेत दुसऱ्या नंबरवर विराजमान असून प्ले ऑफसाठी त्यांचा रस्ता सोपा आहे. तर दुसरीकडे राजस्थान आठ अंकांसह पाचव्या स्थानी आहे. आज जर राजस्थान जिंकला तर तो थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
दिल्लीविरोधात राजस्थानचं पारडं जड
दिल्लीविरोधात राजस्थानचं पारडं तसं जड राहिलं आहे. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली आणि राजस्थानचे संघ आतापर्यंत 23 वेळा आमनेसामने आले आहेत. यात राजस्थाननं 12 तर दिल्लीनं 11 सामने जिंकले आहेत. 2020 च्या आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध राजस्थाननं एकही सामना जिंकला नव्हता.
दिल्लीची संभावित प्लेइंग इलेव्हन- पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टोयनिस/स्टिव्ह स्मिथ, शिमरन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कगीसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि आवेश खान.
राजस्थानची संभावित प्लेइंग इलेव्हन- एविन लुईस, यशस्वी जयसवाल, संजू सैमसन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, चेतन सकारिया, कार्तिक त्यागी आणि मुस्तफिजुर रहमान.