UPSC Result : जिद्द, मेहनत आणि कठोर परिश्रमातून मिळणारं यश किती मोठं असतं याचं उदाहरण अहमदनगर येथील विनायक नरवडे (Vinayak Narwade) याने दाखवून दिले आहे. अमेरिकेतील नोकरी सोडून पुन्हा भारतात येऊन विनायक नरवडे याने UPSC चा अभ्यास केला. आज विनायक नरवडे हा यूपीएससी परीक्षेत देशात 37 तर महाराष्ट्रात दुसरा आलाय.
गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगच्या ( UPSC) परीक्षेत यश मिळविणाऱ्यांत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात अहमदनगर जिल्ह्यातील विनायक नरवडे याला घवघवीत यश मिळाले आहे. विनायक नरवडे यांनी देशात 37 वा तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.
विनायकचे प्राथमिक शिक्षण येथील आठरे पब्लिक स्कूल तर उच्च माध्यमिकचे शिक्षण सारडा महाविद्यालयात आणि उच्च शिक्षण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे झाले. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यावर विनायकने अभियांत्रिकीचे पुढील उच्च शिक्षण (एमएस इंजिनिअरिंग) अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीत पूर्ण करून अमेरिकेत एक वर्ष नोकरी केली. मात्र, प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय निश्चित केल्याने विनायकने पुन्हा आपल्या घरी येऊन UPSC चा अभ्यास केला. त्याने दुसऱ्या प्रयत्नात UPSC चा गड राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होत सर केला आहे.
विनायकचे वडील डॉक्टर असून त्यांचे नेवासे तालुक्यातील कुकाणे येथे हॉस्पिटल आहे. पण तरीही त्यांनी चिरंजीव विनायक याला डॉक्टर होण्यास आग्रह न धरता UPSC परीक्षा देण्यास पूर्ण सहकार्य केले. विनायकने मिळवलेले यश पाहून त्याच्या आई-वडिलांना भरभरून आनंद झालाय.
राज्यातील लाखो मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. स्पर्धा परीक्षेत अभ्यास करताना सातत्य आणि मेहनत याची सांगड असल्याशिवाय यश मिळणं कठीण आहे. मात्र जिद्दीने अभ्यास करून विनायकने मिळवलेलं यश हे निश्चितच नेत्रदीपकच म्हणावे लागेल.
संबंधित बातम्या :