नवी दिल्ली : कर्णधार श्रेयस अय्यरनं तीन चौकार आणि दहा षटकारांच्या साथीनं नाबाद ९३ धावांची खेळी उभारुन, दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये नवी जान ओतली. श्रेयसच्या याच खेळीच्या जोरावर दिल्लीनं कोलकाता नाईट रायडर्सचा तब्बल ५५ धावांनी धुव्वा उडवला.
दिल्लीचा हा सात सामन्यांमधला दुसरा विजय ठरला. दिल्लीच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारुन गौतम गंभीरनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळं दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती.
श्रेयसनं पहिल्याच सामन्यात कर्णधारास साजेशी खेळी करुन दिल्लीच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. या सामन्यात दिल्लीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना चार बाद २१९ धावांची मजल मारली होती. त्यानंतर कोलकात्याला नऊ बाद १६४ धावांचीच मजल मारता आली.