कानपूर : दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या श्रेयस अय्यरचं शतक चार धावांनी हुकलं पण त्याच्या 96 धावांच्या खेळीने दिल्लीला गुजरातवर दोन विकेट्सनी विजय मिळवून दिला.


दिल्ली आणि गुजरात या दोन्ही संघांचं आयपीएलमधलं आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. त्यामुळे हा सामना म्हणजे निव्वळ औपचारिकता होती. या सामन्यात गुजरातने दिलेल्या 196 धावांच्या दिल्लीने यशस्वी पाठलाग केला.

दिल्लीच्या विजयाचं मुख्य श्रेय हे श्रेयस अय्यरला जातं. मूळच्या मुंबईच्या या फलंदाजाने 57 चेंडूंत 15 चौकार आणि दोन षटकारांसह 96 धावांची खेळी रचून दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्याआधी या सामन्यात दिनेश कार्तिक आणि अॅरॉन फिन्च यांनी चौथ्या विकेटसाठी 58 चेंडूंत केलेल्या 92 धावांच्या भागीदारीने गुजरातच्या डावाला मजबुती दिली.

गुजरातने 20 षटकांत पाच बाद 195 धावांची मजल मारली. दिनेश कार्तिकचा वाटा होता 28 चेंडूंत 40 धावांचा, तर अरॉन फिन्चचं योगदान होतं 39 चेंडूंत 69 धावांचं. ईशान किशननेही 34 धावांची उपयुक्त खेळी केली.