सिडनी: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमधील तिसऱ्या कसोटीत सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं तुफानी फंलदाजी करत पहिल्या दिवसाच्या लंचच्या आधीच शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. अशी किमया करणारा वॉर्नर हा जगातील पाचवा आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज बनला आहे.


वॉर्नरच्या आधी ऑस्ट्रेलियाकडून डॉन ब्रॅडमन यांनी 1930 साली असा कारनामा केला होता. तर 1976 साली पाकिस्तानच्या माजिद खान यानं ही कामगिरी केली होती. वॉर्नरनं पाकिस्ताविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाच्या लंचपर्यंत नाबाद 100 धावा केल्या. त्यानंतर तो 113 धावांवर बाद झाला.

या कामगिरीनंतर वॉर्नर म्हणाला की, 'या विक्रमामुळे आनंद झाला आहे. माझा हा फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.'

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टर ट्रंपरनं 1902 साली मॅनचेस्टरमधील सामन्यात लंचपूर्वी 103 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्याच चार्ली मैकार्टनी यांनी 1926 साली लीड्समध्ये 112 धावा केल्या होत्या.

तर ब्रॅडमन यांनी 1930 साली लंचआधी 105 धावा करण्याचा विक्रम केला होता. तसेच याच डावात त्यांनी 334 धावांचा विक्रमही केला होता. या यादीत पाकिस्तानच्या माजिद खानचा चौथा क्रमांक लागतो. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 1976मध्ये कराचीत 108 धावा केल्या होत्या. तर वॉर्नरनं या सगळ्यांचा विक्रम मोडीत काढत अवघ्या 78 चेंडूत शतक पूर्ण केलं. सिडनीच्या मैदानावरील हे आजवरचं सर्वात वेगवान शतक आहे.