मुंबई : आयपीएलच्या नवव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या कर्णधारपदासाठी खांदेपालट करण्यात आली आहे. उर्वरित सामन्यांसाठी पंजाबच्या कर्णधारपदी भारताचा कसोटी खेळाडू आणि पंजाब संघाचा स्टार फलंदाज मुरली विजयची निवड करण्यात आली आहे.


 
पंजाब संघाचा सध्याचा कर्णधार डेव्हिड मिलरला या सत्रात अजूनही सूर गवसलेला नाही. तसेच पंजाब संघ गुणतालिकेत सर्वात तळाला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

 

 

मुरली विजय

 

 
या हंगामात मिलरला कर्णधार म्हणून सहा सामन्यांमध्ये केवळ 76 धावाच काढता आल्या. तर सहापैकी केवळ एकच विजय मिळवून देण्यात मिलरला यश आलं. मिलरच्या तुलनेत मुरली विजयची बाजू भक्कम दिसून येत आहे. मुरली विजयने आतापर्यंत पंजाबकडून एकूण 17 सामने खेळले आहेत. त्यापैकी या हंगामातील सहा सामन्यांमध्ये 143 धावा ठोकल्या आहेत.

 
मिलरला उर्वरित सामन्यांमध्ये पूर्ण स्वातंत्र्याने खेळता यावे या हेतूने व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असावा. त्यामुळे आता नव्या कर्णधार मुरली विजयच्या नेतृत्वाखाली तरी पंजाब संघाला विजय मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.