मुंबई : 105 हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह जो संयुक्त महाराष्ट्र घडला त्या महाराष्ट्राला आज 57 वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षी प्रमाणेच यंदाही ठिकठिकाणी महाराष्ट्र दिनाचा जल्लोष केला जात आहे.


 
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य राखीव पोलीस दलाने संचलन केलं. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शहीदांना आदरांजली वाहिली. यंदाचा दुष्काळ, भविष्यातली आव्हानं याबाबत सरकारची ध्येय-धोरणंही त्यांनी आपल्या भाषणात मांडली.

 

नागपुरात अणेंचा स्वतंत्र विदर्भाचा यल्गार :

एकीकडे महाराष्ट्र दिन साजरा होत असताना विदर्भात स्वतंत्र राज्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं झाली. नागपुरात विदर्भवाद्यांनी श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात वेगळ्या विदर्भाचे नारे देत, वेगळा झेंडाही फडकावला.

 

 

अणेंविरोधात शिवसेनेचं आंदोलन :

शिवसेनेनं श्रीहरी अणे यांच्या पुतळ्याचं दहन करत वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाविरोधात निषेध व्यक्त केला. उद्धव ठाकरे मला दळभद्री म्हणाले, मात्र पातळी सोडून बोलणं विदर्भाच्या रक्तात नाही, असं उत्तर अणे यांनी उद्धव ठाकरेंना यावेळी दिलं.

 

 



 

अणेंविरोधात मनसेचाही अखंड महाराष्ट्राचा जयघोष :

नागपूरमध्ये अणे महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळत असताना, बाजूच्याच लॉन्सवर मनसेनं अखंड महाराष्ट्राचा जयघोष केला. यावेळी अखंड महाराष्ट्रासाठी ढोल ताशे वाजवून गजर करण्यात आला. श्रीहरी अणेंनी विदर्भात 1 मे हा काळा दिवस म्हणून पाळण्याचे आंदेश दिल्यानंतर मनसेनं अणेंना प्रत्युत्तर म्हणून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.

 

यवतमाळमध्ये एसटीची तोडफोड :

विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला हिसक वळण लागलं. यवतमाळ बसस्थानकात आंदोलनकर्त्यांनी 5 एसटी बसेसची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

बुलडाण्यातही विदर्भ राज्याच्या मागणीसाठी घोषणा देत झेंडा फडकवण्यात आला. विदर्भवाद्यांनी काळ्या फिती लावून महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळला. महाराष्ट्र दिनाला वेगळ्या विदर्भाचं आंदोलन पेटलं असताना जालन्यात वेगळ्या मराठवाड्यासाठी मुक्त मराठवाड्याचा झेंडा फडकवण्यात आला.