Commonwealth Games 2022 : बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 (Commonwealth 2022) मध्ये भारतीय वेटलिफ्टर्सचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतानं याच खेळात आणखी एक पदक मिळवलं आहे. भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने (Harjinder Kaur) कांस्य पदक खिशात घातलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 71 किलो वजनी गटात हरजिंदरनं ही कामगिरी केली आहे.
हरजिंदर कौरनं स्नॅचमध्ये 93 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 119 किलो असं एकूण 212 किलो वजन उचलून कांस्य पदक जिंकलं आहे. विशेष म्हणजे स्नॅच राऊंडनंतर ती चौथ्या स्थानावर होती, पण क्लीन अँड जर्कमध्ये तिने पुनरागमन करत अखेर कांस्य पदक मिळवलं आहे. या पदकामुळे कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं नऊ पदकांवर झडप घातली आहे. विशेष म्हणजे यातील सात पदकं ही वेटलिफ्टिंग या खेळातच भारतानं मिळवली आहेत.
भारताची पदकसंख्या 9
हरजिंदरनं मिळवलेल्या कांस्य पदकामुळे भारताची पदकसंख्या नऊवर गेली आहे. काही वेळापूर्वीच सुशीला देवीने ज्युदोमध्ये रौप्य मिळवलं असून विजयकुमारनेही कांस्य पदक मिळवलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 8 वर गेली होती. याआधी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू, अचिंता शेउली, जेरेमी लालरिनुंगा यांनी सुवर्णपदक जिंकलं असून संकेत सरगर आणि बिंद्याराणी देवी यांनी रौप्य पदक मिळवलं आहे. तसंच गुरुराजा पुजारी यानेही कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. याशिवाय लॉन बाऊल्समध्येही भारतीय महिलांचा ग्रुपने फायनलमध्ये पोहोचल्याने किमान रौप्यपदक भारताने निश्चित केलं आहे. तर बॅडमिंटन संघानेही फायनलमध्ये ध़डक घेत किमान रौप्यपदक निश्चित केलं आहे. या पदकांसह भारताच्या खात्यावर 11 पदकं झाली असून ही दोन पदकं सुवर्ण असतील की रौप्य हे पाहावं लागेल.
हे देखील वाचा-