वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात 196 किलो वजन उचललं. ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
वेटलिफ्टर गुरुराजाने पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करुन भारताचं पदकांचं खातं उघडलं होतं. त्यापाठोपाठ मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावून चार चांद लावले आहेत.
GC2018 : 249 किलो वजन उचललं, गुरुराजाला रौप्यपदक!
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बॅडमिंटनमध्ये विजयी सुरुवात झाली. सांघिक बॅडमिंटनमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा 5-0 ने धुव्वा उडवला.
दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा
एकविसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा क्वीन्सलँडच्या करारा स्टेडियमवर रंगला. या उद्घाटन सोहळ्याच्या संचलनावेळी पी. व्ही. सिंधूनं भारतीय पथकाचं नेतृत्त्व केलं.
या स्पर्धेसाठी भारताचं 225 खेळाडूंचं पथक सज्ज झालं आहे. गोल्ड कोस्टच्या राष्ट्कुल क्रीडा स्पर्धेत एकूण 19 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातल्या 14 प्रकारात भारताचा सहभाग असणार आहे. त्यात प्रामुख्यानं अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, नेमबाजी, कुस्ती, स्क्वॉश आणि वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदकाची अपेक्षा आहे.
गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी
भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे.
2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकं आणि आता 2018 सालच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झालंय 225 शिलेदारांचं भारतीय पथक.