मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेची तुलना गांडुळाशी केल्यानंतर, आज शिवसेनेने ‘सामना’तून त्यांच्यावर पलटवार केला आहे.
‘सामना’मध्ये अजित पवारांवर जहरी टीका करण्यात आली आहे.
शरद पवारांनी जे कमावले ते अजित पवारांनी अल्पावधीतच गमावले. त्यामुळेच 75 व्या वर्षातसुद्धा पक्षबांधणीसाठी पवारांना वणवण करावी लागत असल्याची टीका, सामनातून करण्यात आली आहे.
आम्हाला गांडूळ म्हणणाऱ्यांना दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. म्हणून तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असंच म्हणावं लागेल, असा हल्ला शिवसेनेने चढवला आहे.
‘सामना’त नेमकं काय म्हटलंय?
"शेतकरी हक्काचे पाणी मागायला तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही त्यांना ‘मूत्र’ पाजण्याची भाषा केलीत. हेच तुमचे शेतकरीप्रेम! मग त्या अर्थाने तुम्हाला दुतोंडी साप म्हणणे हा त्यासापाचाही अपमान ठरेल. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असेम्हणावे लागेल.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवारांची पत ती काय, पण तरीही त्यांच्या जिभेचा गांडूळ अधूनमधून वळवळत असतो. कालच त्यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेची संभावना ‘गांडुळाची अवलाद’ अशी केली. शिवसेनेच्या गांडुळाचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही असे ते म्हणाले. आता आमच्या गांडुळाचा मुका घेण्याचा प्रयत्न अजित पवारांनी कधी केला हे त्यांनी एकदा सांगून टाकावे. अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी गांभीर्याने घेत नाही. त्यांना जो काही मानसन्मान आतापर्यंत मिळाला तो त्यांच्या आदरणीय काकांमुळे. पण काकांनी संपूर्ण संधी व पाठबळ देऊनही अजित पवारांना नेतृत्व उभे करता आले नाही. कारण त्यांचे तोंड व जीभ म्हणजे भ्रष्ट गटार आहे व येणाऱ्या-जाणाऱ्यांवर त्यांच्या गटारी तोंडाने थुंकून ते घाण करीत असतात. काकांनी पन्नास वर्षांत कमावले ते अजित पवारांनी
अल्पावधीत गमावल्यामुळेच शरद पवारांना ७५ व्या वर्षीसुद्धा पक्षबांधणीसाठी वणवण करावी लागत आहे".