सिडनी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या कॅमेरूनच्या पथकातले पाच अॅथलिट्स क्रीडाग्रामातून पळून गेल्याचं वृत्त आहे. त्या पाच जणांत तीन वेटलिफ्टर्स आणि दोन बॉक्सर्सचा समावेश आहे. हे पाचही अॅथलिट्स दोन दिवसांपासून गायब आहेत.


राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर मायदेशात परतण्याचं टाळण्यासाठीच त्यांनी क्रीडाग्रामातून पलायन केल्याचा संशय आहे. मध्य आफ्रिकेतल्या कॅमेरून देशात सध्या असंतोषाचं वातावरण आहे.

कॅमेरूनच्या लष्कराने तिथल्या इंग्रजीभाषिक बंडखोरांवर केलेल्या कारवाईने त्या देशात सध्या असंतोष खदखदत आहे. त्या अस्थिर वातावरणाच्या भीतीनेच कॅमेरूनमध्ये परतण्याचं टाळण्याचा पाच अॅथलिट्सचा प्रयत्न आहे.

ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तर स्पर्धेच्या आयोजकांनीही चौकशी करुन खेळाडूंना काही अडचण असेल, तर ती सोडवली जाईल, असं म्हटलं आहे.