मुंबई : आयपीएलच्या 14 व्या हंगामात दिल्लीने विजयी सुरुवात केली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा 7 विकेट्सनी पराभव केला. चेन्नईने दिल्लीला 189 धावांचं आव्हान दिलं होतं. पृथ्वी शॉ आणि शिखर यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर दिल्लीने हे लक्ष्य 18.4 षटकांत पूर्ण केलं. 
 
चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड सलामी उतरले. मात्र, दुसऱ्याच षटकात फाफ डु प्लेसिसला आवेश खानने शून्यावर माघारी धाडले. त्याच्या पुढच्याच षटकात ख्रिस वोक्सने ऋतुराजला 5 धावांवर बाद केलं. त्यानंतर सुरेश रैना आणि मोईन अली यांनी डाव सावरत सुरेख खेळी केली. मोईन अलीने नवव्या षटकात अश्विनला लागोपाठ दोन षटकार ठोकले. मात्र, या षटकारानंतर अश्विनने त्याला बाद केलं. अलीने 4 चौकार आणि 2 षटकारांसह 36 धावांची खेळी केली.


त्यानंतर आलेल्या अंबाती रायुडू आणि सुरेश रैनाने तेराव्या षटकात संघाला चांगल्या स्थितीत आणले. टॉम करनने या रैना-रायुडूची भागीदारी तोडली. रायडू मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याने 23 धावा केल्या. 16 व्या षटकात रैनाही धावबाद झाला. आयपीएलचा मागील हंगाम न खेळलेल्या रैनाने दमदार पुनरागमन करत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 54 धावांची खेळी केली. धोनीने मात्र आज निराशा केली. आवेश खानने त्याला शून्यावर बाद केलं. धोनी बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांनी चांगली भागिदारी केली. करनने 15 चेंडूत 34 धावांची खेळी केली तर जडेजा 26 धावांवर नाबाद राहिला. दिल्लीकडून ख्रिस वोक्स आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 2 तर, अश्विन आणि टॉम करन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.