मुंबई : ख्रिस्तियानो रोनाल्डो हा मुरलेल्या वाईनसारखा आहे... वाईन ही जितकी जुनी आणि मुरलेली, तितकी ती चांगली असते... पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डो आणि वाईनची तुलना करणारे हे शब्द पोर्तुगालचेच प्रशिक्षक फर्नांडो सँटोस यांचे.
फर्नांडो सँटोस यांना रोनाल्डोची मुरलेल्या वाईनची तुलना करण्याचा मोह आवरला नाही, कारण रशियातल्या फिफा विश्वचषकात रोनाल्डो जबरदस्त फॉर्मात आहे. या विश्वचषकाच्या ‘ब’ गटात पोर्तुगालने स्पेनला 3-3 असं रोखण्याचा पराक्रम गाजवला त्या सामन्यातले तिन्ही गोल्स हे रोनाल्डोचे होते. मग पोर्तुगालने मोरोक्कोचा संघर्ष 1-0 असा मोडून काढला, त्या सामन्यातला एकमेव गोल 'हेड'मास्तर रोनाल्डोचाच होता. 'हेड'मास्तर... कारण तो गोल डोक्याने केलेला होता.
फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलवीर हा किताब रोनाल्डोने आजवरच्या कारकीर्दीत पाचवेळा मिळवला आहे. पण गेल्या तीन विश्वचषकांत मिळून रोनाल्डोला केवळ तीन गोलवरच समाधान मानावं लागलं होतं. त्याच रोनाल्डोने यंदा केवळ दोन सामन्यांमध्येच चार गोल डागले आहेत.
रोनाल्डोची यंदाच्या विश्वचषकातली कामगिरी लक्षात घेऊनच, पोर्तुगाली प्रशिक्षक फर्नांडो सँटोस यांनी त्याची तुलना जुन्या आणि मुरलेल्या वाईनशी केली आहे. वाईन जितकी जुनी आणि मुरलेली तितकी मस्त, तसाच रोनाल्डो हाही वाढत्या वयानुसार अधिकाधिक परिपक्व झाला असल्याची भावना फर्नांडो सँटोस यांनी बोलून दाखवली आहे.
फर्नांडो सँटोस म्हणतात की, रोनाल्डो आपल्या खेळात सुधारणा घडवून आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतो. रोनाल्डोला समकालीने फुटबॉलवीरांमध्ये हा गुण अभावानेच आढळतो. सलग दोनतीन वर्षे तो एकाच खुबीनं खेळतोय, असं कधीच दिसणार नाही. तसंच चारपाच वर्षांपूर्वी वापरलेलं कौशल्यही तो पुन्हा वापरताना आढळत नाही. त्यामुळंच विश्वचषकाच्या युरोपीय पात्रता सामन्यांमध्ये त्याच्या नावावर आपल्याला तब्बल 15 गोल्स लागलेले दिसतात. त्याची हीच कामगिरी पोर्तुगालला सलग नऊ विजयांसह पाचव्यांदा विश्वचषकाचं तिकीट मिळवून देते.
रशियातला विश्वचषक हा रोनाल्डोचा चौथा आणि कदाचित अखेरचा विश्वचषक आहे. कारण रोनाल्डो आज 33 वर्षांचा आहे. त्याची कामगिरी आधीच्या तुलनेत उतरणीला लागली आहे. पण या वयातही तो रिआल माद्रिदला पाच मोसमांत चौथ्यांदा चॅम्पियन्स लीग जिंकून देऊ शकतो. 2016 साली रोनाल्डोनेच पोर्तुगालला पहिल्यांदाच युरो कप जिंकून दिला होता. पण गेल्या तीन विश्वचषकांत रोनाल्डो आणि त्याच्या पोर्तुगालला मोठं यश मिळू शकलेलं नाही. 2006 सालच्या विश्वचषकात पोर्तुगालचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं होतं. त्यानंतर 2010 साली पोर्तुगालचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत, तर 2014 साली गटातच गारद झाला होता.
त्यामुळे साहजिकच यंदा विश्वचषकातून निरोप घेताना, फुटबॉलविश्वाच्या त्या सर्वोच्च व्यासपीठावर आपला ठसा उमटवण्याचा रोनाल्डोचा प्रयत्न राहिल. त्यासाठी विश्वचषकाखेरीज दुसरं कोणतंही लक्ष्य त्याच्या नजरेसमोर नसेल.
स्पेशल रिपोर्ट : रोनाल्डो आणि मुरलेली वाईन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jun 2018 08:46 PM (IST)
लायनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो... आजच्या जमान्यातल्या फुटबॉलचे दोन नायक. रशियातल्या विश्वचषकात मेसी आणि त्याच्या अर्जेंटिनाच्या नशिबात संघर्ष आला आहे, तर रोनाल्डोला एक फुटबॉलवीर म्हणून घवघवीत यश मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात रोनाल्डोचं वेगळेपण सांगणारा हा रिपोर्ट.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -