मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद वाढतच आहे. दमानियांविरोधात खडसेंनी जळगाव न्यायालयात बदनामीचा खटला दाखल करुन आपण हा न्यायालयीन लढा सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.


खरे मर्द असाल तर उच्च न्यायालयात माझ्याशी लढून दाखवावं, असं थेट आव्हान अंदली दमानियांनी दिलं होतं. खडसेंनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलीस अटक करण्याच्या अगोदरच त्या जळगावच्या पोलीस अधीक्षकांकडे हजर झाल्या होत्या. या वेळी दमानियांनी पत्रकार परिषद घेत खडसे यांनी न्यायालय आणि पोलिसांची दिशाभूल करून आपल्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याचा आरोप केला होता.

न्यायालयीन लढा खालच्या कोर्टापासून सुरु होतो. थेट उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टात जाता येत नसल्याचं म्हणत खडसेंनी दमानियांना प्रत्युत्तर दिलं.

''दमानिया यांनी थेट न्यायालयावर आक्षेप घेतला आणि अविश्वास दाखवला. त्याच बरोबर खडसे न्यायालयावर देखील दबाव आणू शकतात अशी आपली प्रतिमा तयार झाली. म्हणून आपली बदनामी झाल्याच्या कारणास्तव आपण दमानिया यांच्याविरोधात बदनामीचा म्हणजेच क्रिमिनल डिफर्मेशनचा खटला दाखल करत आहोत,'' असं खडसेंनी सांगितलं.

''दमानियांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असतानाही त्या पोलीसांना आव्हान देतात आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतः हजर होऊन मला अटक करा असं सांगतात. तरीही गृह खातं त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. यामुळेच त्यांची ही हिंमत वाढत असावी,'' असंही खडसे म्हणाले.