सुरेश रैनाच्या कारचा टायर फुटला, पोलिसांची रैनाला तात्काळ मदत
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2017 11:45 AM (IST)
टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुरेश रैना काल (सोमवार) एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला.
फोटो सौजन्य : रैना ट्वीटर
नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुरेश रैना काल (सोमवार) एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला. दुलीप करंडकातील एका सामन्यासाठी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये जात असताना अचानक त्याच्या कारचा टायर फुटला. मीडिया रिपोर्टनुसार, रैना आपल्या कारनं दिल्लीहून कानपूरला चालला होता. यावेळी इटावातील फ्रेंडस कॉलनीजवळ त्याच्या कारचा एक टायर अचानक फुटला. काल (सोमवार) रात्री झालेल्या या घटनेनंतर रैनानं स्थानिक पोलिसांची मदत घेतली. यावेळी पोलिसांनी रैनासाठी दुसऱ्या कारची व्यवस्था केली. ज्यानंतर रैना तिथून कानपूरसाठी रवाना झाला. कारचा टायर फुटल्यानं कानपूरमध्ये पोहचण्यास त्याला बराच उशीर झाला. अखेर रैना आज सकाळी 7 वाजता कानपूरमध्ये पोहचला. दरम्यान, दुलीप करंडकात रैनावर इंडिया ब्ल्यू संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान इंडिया ब्ल्यू आणि इंडिया रेड यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये सामना होणार आहे.