खरंतर वडापाव आणि मिसळ या दोन पदार्थांना महाराष्ट्र सरकारने सन्मानाने ‘राज्य-नाश्त्याचा’ दर्जा द्यावा,अशी माझी आग्रही मागणी आहे. त्यापैकी मिसळीवर मी अजून काही लिहिणं म्हणजे, मधुबालाबद्दल किशोरकुमारनी पुन्हा-पुन्हा लिहिण्यासारखं आहे.काय आणि किती बोलणार,काही लिमिट? त्यामुळे मिसळ निदान आजतरी नको.

आज जरा महाराष्ट्राची अजून एक चविष्ट ओळख बटाटेवडा, त्याच्या आठवणीबद्दल आणि काही ठिकाणांबद्दल. वड्याबद्दल लिहायचं झालं, तर ज्याला सगळ्यात आधी स्वतःच्या घरचा बटाटेवडा आठवतो. तो निदान खवैय्या तरी नाही किंवा प्रामाणिक तरी नाही.

गाडीवर मळखाऊ लेंगा आणि त्यावर मुळचा रंग विसरुन वड्याच्या प्रेमाखातर काळा पडलेला जाळीचा बनियन घालून, घामानी निथळत उभ्या असलेल्या बल्लवानी, कळकट्ट कढईतून भल्यामोठ्या झाऱ्यातून बाहेर काढलेल्या वड्यांना जी चव आहे; ती घरच्या छोट्या स्वच्छ कढईत, शुद्ध रिफाईंड तेलात तळलेल्या ‘हायजिनिक’ वगैरे वड्याला केवळ अशक्य! सनी लिऑनीच्या ऐवजी सफेद साडी परिधान केलेल्या सोज्वळ सुलोचनादीदींना बघितलं तर कसं चालेल? तर सांगायचा मुद्दा असा की, ‘बटाटवड्याची’ पहिली आठवण ही फक्त बाहेर मिळणाऱ्या वडापावचीच.

फाईल फोटो

80 च्या दशकात वडापावचा बोलबाला नुकताच सुरु झालेला असताना पुण्यात, त्याच्या गाड्याही अगदीच माफक प्रमाणात होत्या. वडापाव आणि मिथुन चक्रवर्ती दोघेही फक्त गरिबांचेच असण्याचा काळ होता.

घरून दिलेला डबा नसेल आणि खिशात पैसे कमी असतील (पैसे म्हणजे शब्दशः पैसे) तर पेरुगेटबाहेरची वडापावची गाडी आमच्या जीवाला आधार असायची. जवळपास 1992 सालापर्यंत तिथे 50 पैशात वडापाव मिळत असे. कसा द्यायचे आणि त्यातून कमवायचे किती? हा प्रश्न आता पडतो. पण गाडीवरचा वडापाव म्हणजे फक्त ‘उदरभरण’ म्हणूनच ओके. त्याचवेळी शाळेसमोरच्या कॉर्नरला लक्ष्मी विश्रांतीगृहात बटाटावडा आधी 90 पैसे नंतर 1 रुपयाला मिळायचा. पण लक्ष्मी विश्रांतीगृहचा वडा म्हणजे केवळ पैसा वस्सूल. सणसणीत आकाराचा वडा, त्यावर घ्यायला कॅश काऊंटरच्या फळीवर मोठ्या ताटात भरपूर लसूण घातलेली लालभडक भुकटी कम चटणी ठेवलेली असायची. घ्या आपल्या हातानी वाढून आणि खायची तेवढी खा लेकाच्यांनो!! असे कौतुकमिश्रीत भाव शाळेतल्या मुलांकडे कॅश काऊंटरच्या पलीकडून निवांत बघणाऱ्या दोघा मालक बंधूंच्या चेहऱ्यावर असायचे.

त्यावेळी घरी जायच्या वाटेत दांडेकर दुसऱ्या टोकाला जुना दोस्त संजय गरखच्या वडलांच्या वडापावची सिंहगड रस्त्यावरची एकुलती एक  गाडी असायची. सकाळी, दुपारी हमाल कट्ट्यावरील लोकांची तिथे गर्दी व्हायची. आता बऱ्याच गाड्या लागत असतील, तरी तिथे गर्दी अजूनही दिसते.

पुढे कॉलेजला गेल्यावर टिळक रोडवरच्या रामनाथ वगैरे ठिकाणांची मिसळ वारी ग्रुपनी नियमित व्हायला लागली. माझ्या आठवणीत साधारण 1994 पर्यंत रामनाथ म्हणजे पत्र्याची एक मोठी टपरी होती. एका बाजूला मोठ्या पातेल्यात मिसळीचा रस्सा तयार असायचा. आत गेल्यावर उजवीकडे बैठकीवर बसून आचारी किंवा कधी मालक खन्ना स्वतः कोल्हापुरी पद्धतीचे चविष्ट आणि भलेमोठे वडे तळून गिऱ्हाईकांना द्यायचे.

बीएमसीसीला गेलो त्यावेळी कॉलेज कॅन्टीनचा बनवडा म्हणजे पुण्याच्या कॉलेजविश्वात वल्डफेमस होता. पण आमच्या पै काकांनी कॅन्टीन सोडल्यावर आलेल्या आण्णाला मात्र ती ख्याती काहीकाळ टिकवता आली नाही. त्याचवेळी आयएमडीआर बाहेरच्या ‘प्रियदर्शनीच्या’ गिरीश,महेश या सुकाळे बंधूंशी आमची खास मैत्री झाली. ‘हलवायाशी मैत्री जुळल्यावर मिठाईला कमी पडत नाही’, या न्यायाने सतत गरमागरम मिळणाऱ्या वड्यांकरता निदान कॉलेजच्या वेळात तरी इतर गाड्या बघायची वेळ माझ्यावर आली नाही. नंतरच्या काळात आलेल्या पोरांनी आमच्या टपरीचे ‘पीडी’ असे नामकरण केले पण आमच्या लेखी ती कायम गीर्या, मह्याची टपरीच राहील. आता टपरी तिथून गेली. पण त्यांची भोसरी आणि उरळीकांचनला ‘माई वडेवाले’ नावानी मोठी दुकानं झालेत.

काही दिवसांनी कंपनीच्या कामाच्या निमित्तानी गावभर अजूनच मोकाट फिरायला लागलो. पेठेत सतत येणे-जाणे असले, तरी बालगंधर्वसमोरच्या जोशी, भारती या वडेवाले मंडळींबरोबर माझी नाळ कधी जुळलीच नाही. त्यांचे अप्रूप बाहेरुन आलेल्या लोकांना जास्त. मला मात्र खिशातल्या माफक पैशांमुळे नवनवीन गाड्या खुणावायच्या.

नव्या पेठेतल्या विठ्ठल मंदिराबाहेर हल्ली वड्यांच्या 3-4 तरी गाड्या लागतात. पण 7-8 वर्षापूर्वीपर्यंत एक काका (आता नाव विसरलो) स्वतःच्या ठेंगण्या मुलाला मदतनीस घेऊन, तिथे गाडी लावायचे. संध्याकाळी जरा थांबायला सवड असेल तर त्यांच्याकडची पावात घातलेली लसणीची तिखट चटणी, त्यावर एखादी हिरवी मिरची आणि वडा म्हणजे जी जिभेचे अक्षरशः चोचले असायचे. काही वर्षांपूर्वी आपल्या मुलाच्या राहायची, खायची तजवीज करुन काका इंद्राच्या दरबारात वडे तळायला निघून गेले. जवळच हॉटेल तिलकचा वडा, समोसा हा ऑप्शन तर कायमच फेव्हरेट होता,आहे.

रविवार पेठेत कामानिमित्त वरच्यावर जायचो. संध्याकाळी गेलो तर सोन्यामारुती चौकाच्या अलीकडे बोहरी आळीतल्या गाडीवर किंवा पुढे मोती चौकातल्या गाडीवर वडा चांगला असायचा. किंवा वैद्य उपहारगृहाची माणसे दुकानाबाहेर लावतात, त्या गाडीवरही वडे, भज्या सुरेख मिळतात. फडके हौद चौकातल्या दोन गाड्याही तुफान गर्दीत सुरु असतात. रविवारातल्या पलीकडच्या बाजूला कस्तुरे चौकातला वडा अखिल रविवार पेठेत एकदम प्रसिद्ध. त्याच्या अलीकडे फडगेट जवळच्या पानघंटी चौकातल्या टपरीवरही वडा बरा असतो. त्याहीपेक्षा त्यांचे पावपॅटीस आणि पातळ लाल चटणी जास्ती छान.

तिकडे कॅम्पात गेल्यावर नाझ, महानाझच्या समोश्यातून, मार्जोरीनच्या सँडविचमधून क्वचित सवड मिळालीच, तर समोर गार्डन वड्याकडे फिरकायचो. पण आता नळस्टॉपच्या दुकानात मिळतो त्यापेक्षा तो गाडीवरच छान वाटायचा.

नळस्टॉपजवळच्या आनंद ज्यूस बारच्या (अजूबा) समोरची ‘भोला’ची गाडी साधारण 1996-97 च्या सुमाराला सुरु झाली. तोही वडा आत्ताआत्तापर्यंत म्हणजे भोलाचा भोलाशेठ आणि त्याच्या एकाच्या तीन-चार गाड्या होईपर्यंत बरा असायचा.

‘खिडकी वडा’ लहानपणी कल्याणला गेल्यावर सुट्टीत मिळायचा. त्यांनी 5-7 वर्षांपूर्वी पुण्यात दिनानाथजवळ आपली शाखा उघडून, पुणेकरांना ‘खिडकी’ वड्याची सवय लावली. सहज म्हणून त्यांच्या वड्याएवढीच त्यांची कोथिंबीर वडीही छान असते.

आमच्या सिंहगडरोडला ‘अन्नपूर्णा’चा वडा म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत 12-13 तास सतत सुरु असलेला घाणा. साधारण 1994-95 साली आत्ता आहे, त्याच्या समोर सुरु झालेल्या अन्नपूर्णाचा वडा माझ्या अंदाजानी बहुतेक शेंगदाणा तेलात तळलेला असतो. त्यामुळे त्यांच्या बटाटेवड्यांना इतरांपेक्षा वेगळी आणि मस्त खरपूस चव असते. बचत गटाच्या बायका काम करत असलेल्या ह्या बटाटेवड्याची चव आजपर्यंत वडे तळणाऱ्या अक्षरशः शेकडो बायका बदलल्या असतील, तरी कायम एकसारखी कशी असते, ह्याचं मला कुतूहल आणि कौतुक कायमच वाटत आलंय. तसाच एक उत्कृष्ट वडा मिळतो धायरीच्या डीएसके विश्वमधल्या आमच्या विवेक देशमुख ह्यांच्या 'मोरया' मध्ये. वड्याच्या चवीत सुरुवातीपासून म्हणजे साधारण 8-9 वर्ष किंचितही बदल नाही. वड्याएवढीच त्यांची मिसळही वेगळी आणि छान.

सहकारनगरच्या श्रीकृष्ण बेकरीचा वडा म्हणजे दिसायला कोल्हापुरी जम्बो स्टाईल, पण पुणेरी चवीचा वडा. त्याच्याबरोबर दोन पाव आणि वड्याची भरड चणाडाळ घातलेली जाडीभरडी पारी असते, म्हणून प्रसिद्ध असावा. मला त्यापेक्षा नीलायमजवळच्या ना. सी. फडके चौकाच्या अलीकडे एसपीच्या ग्राऊंडकडे जाणाऱ्या कोपऱ्यावरच्या गाडीवरचा वडा अजूनही आवडतो. तसाच वडा मला आवडतो तो कोथरुडला महात्मा सोसायटीजवळच्या डीपीरोडच्या सुरुवातीला मोहन दहिभातेच्या कोथरुड वडापाव सेंटरचा. जेमतेम 3-4 वर्षांपूर्वी साध्या हातगाडीवर सुरुवात केलेला मोहन, आता त्याच गाडीच्या मागचे दुकान आणि हाताशी 4-5 जण कामाला ठेऊन व्यवसाय करतो.

मुंबईवरुन आलेले गोली, जम्बोकिंग त्यांच्या चकाचक आणि मोठ्या दुकानांमुळे, ‘ट्रेंडी आणि फ्लेवर्ड’ वडापावमुळे आता पुण्यात बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेत. पण कॉलेज अर्धवट सोडून वडापाव इमानदारीत विकणारी मोहन दहिभातेसारखी मुलं या फ्रेंचायझी मॉडेलला तोडीस-तोड व्यवसाय करतात. नुसतेच व्यवसाय करत नाहीत, तर इमानदारीत केला तर कुठलाही व्यवसाय छोटा नसतो हेही दाखवून देतात.

लेखाच्या वाढत चाललेल्या लांबीमुळे अजून अनेक ठिकाणांबद्दल लिहिणे आवरते घेतो आणि इथेच थांबतो.

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग :


खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड

खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं

खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ

खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’

खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची

खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी

खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी

खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी

खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा

खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम

खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल

खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा

ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी

खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!

खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा