कोलकाता: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला शिवीगाळ करत त्याच्या कोलकातामधील घरात घुसण्याचा प्रयत्न एका टोळक्यानं केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच याच टोळक्याकडून त्याच्या बिल्डिंगमधील सुरक्षा रक्षकालाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.


नेमकं प्रकरण काय?

मोहम्मद शमी त्याची पत्नी आणि मुलगी शनिवारी रात्री बाहेरुन घरी परतत होते. त्याचवेळी कार पार्किंगदरम्यान एका दुचाकी चालकाशी शमीच्या ड्रायव्हरशी बाचाबाची झाली. त्यानंतर या दुचाकी चालकानं थेट शमीला शिवीगाळ करण्यात सुरुवात केली. बराच वेळ हा वाद सुरु होता. त्यानंतर दुचाकी चालक तिथून निघून गेला. पण थोड्याच वेळानं आणखी तिघांना सोबत घेऊन तो युवक शमीच्या बिल्डिंगमध्ये परत आला.

हे चौघेही शमीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना बिल्डिंगच्या सुरक्षारक्षकानं त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी त्या सुरक्षा रक्षकालाही शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. शमीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न फसल्यानं हे टोळकं पुन्हा माघारी परतलं. पण हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

या सर्व प्रकारानंतर शमीच्या पत्नीनं जादवपूर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या चारही जणांना अटक केली.

'शमी कधीच सेलिब्रिटीसारखा वागत नाही'

शमी हा गेल्या अनेक वर्षापासून दक्षिण कोलकातामधील काटजूनगरमध्ये राहतो. पण शमी किंवा त्याच्या कुटुंबीयांचा आम्हाला आजपर्यंत कधीच त्रास झालेला नाही. तो सेलिब्रिटी असल्यासारखा कधीच वागत नाही. अशी प्रतिक्रिया शमीच्या शेजाऱ्यांनी यावेळी दिली.

संबंधित बातम्या

पत्नीसोबतच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट, शमीचं सडेतोड उत्तर

पत्नीसोबतचा फोटो शेअर करुन शमीच्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा!