मुंबई: मुंबईत काल (सोमवार) दिवसभर विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 3 वर्षातील सर्वात धुवाँधार पावसानं काल मुंबईला झोडपलं. तसेच आज सकाळपासूनही पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच आहे. यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी 68 टक्क्यांपर्यंत गेली आहे.


दरम्यान कालच्या जोरदार पावसानं मुंबईच्या अनेक भागात पाणीच पाणी झालं आहे. चेंबूर, खार, अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात पाणी साचलं आहे. तसंच मुंबईची लाईफलाईनही पावसामुळे विस्कळीत झाली आहे. मध्य आणि हार्बरवर 10 मिनिटं गाड्या उशिरानं धावत आहे. तर पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस दीड ते 2 तास उशिरानं सुरु आहेत.

काल दिवसभरही मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू होता. येत्या २४ तासात मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या ३-४ दिवसात राज्यात ठिकठिकाणी पावसानं चांगलाच जोर धरल्याचं दिसतं आहे.

तर तिकडे तळकोकणातही दमदार पाऊस बरसतो आहे. काल दुपारपासून सुरु असलेल्या पावसानं थोडीही विश्रांती घेतलेली नाही. नद्यांच्या पाणी पातळीत बरीच वाढ झाली आहे. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, दोडामार्ग या जिल्ह्याच्या सगळ्याच भागात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे.

विदर्भासह मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, महाबळेश्वर, सातारा, पुण्यातील ग्रामीण भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मात्र मराठवाड्याकडे अद्यापही पावसानं पाठ फिरवलेलीच आहे. त्यामुळे बळीराजाही चिंताग्रस्त आहे.