जयपूर: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पंड्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप आहे.


त्यामुळे जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) कोर्टाने हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कोर्टात करण्यात आली होती. ती कोर्टाने मान्य करत, पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

ट्विटमुळे पंड्या अडचणीत

हार्दिक पंड्याने 26 डिसेंबर 2017 रोजी भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्याविरोधात डी आर मेघवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करुन, गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.

पंड्याने बाबासाहेबांबत आक्षेपार्ह ट्विट केल्याने, त्याने दलित समाजाच्या भावना भडकवल्या, असा आरोप मेघवाल यांनी केला आहे.

पंड्याचं ट्विट, मेघवाल यांचा दावा

पंड्याने ‘कोण आंबेडकर?’ असं ट्विट केल्याचा दावा मेघवाल यांनी केल्याचं वृत्त, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

सध्या पंड्याच्या ट्विटवर 26 डिसेंबर 2017 रोजी कोणतंही ट्विट दिसत नाही.  त्यामुळे पंड्याच्या नावे केलेलं ट्विट बनावट अकाऊंटवरुनही असू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मात्र सध्या त्याबाबत काहीही स्पष्ट न झाल्याने कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.