नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा फलंदाज गौतम गंभीर सध्या मैदानापासून दूर असला तरी कायम चर्चेत असतो. शानदार फलंदाजीसह आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या क्रिकेटरचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. या फोटोंमध्ये गंभीरने डोक्यावर ओढणी आणि कपाळावर टिकली लावल्याची दिसत आहे.


तृतीयपंथी समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गौतम गंभीरने उपस्थिती लावली होती. 'हिजड़ा हब्बा' असं या कार्यक्रमाचं नाव होतं. गौतम गंभीर इथे पोहोचल्यानंतर त्यावेळी तृतीयपंथीयांनी त्याला त्यांच्याप्रमाणे तयार होण्यास मदत केली आणि या फोटोंची सध्या जोरदार चर्चा आहे. भेदभावाचा सामना करणाऱ्या तृतीयपंथी समाजाला समर्थन देण्यासाठी गौतम गंभीरने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हे कारण समजल्यानंतर सगळ्यांनीच गंभीरचं कौतुक केलं.



काही दिवसांपूर्वी गंभीरने रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यात अभीना आणि सिमरन या तृतीयपंथीयांनी त्याला राखी बांधली होती. "ही पुरुष किंवा स्त्री असण्याची नाही तर माणूस असण्याची गोष्ट आहे. तृतीयपंथी अभीना अहेर आणि सिमरन शेख यांनी राखीच्या रुपात माझ्या मनगटावर त्यांचं प्रेम बांधलं आहे. मी त्यांना अशाचप्रकारे स्वीकारलं आहे. तुम्ही पण असं करणार का?" असं गंभीरने ट्वीटमध्ये लिहिलं आहे.


गौतम गंभीर बऱ्याच दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. तर यंदा आयपीएलमध्ये सुरुवातीच्या सामन्यांमधील पराभवानंतर त्याने कर्णधारपद सोडलं होतं. तर इतर सामन्यांमधून त्याने माघार घेतली होती. गंभीर सातत्याने सामाजिक आणि देशाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर आवाज उठवतो.