नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गंभीर पुढच्या वर्षी भाजपतर्फे दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. गौतम गंभीर गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.


दिल्लीत सध्या आम आदमी पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे भाजप प्रसिद्ध चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गौतम गंभीरच्या खांद्यावर ही धुरा सोपवली जाण्याचे संकेत आहेत.

गंभीरने 2016 मध्ये अखेरची कसोटी, तर 2013 मध्ये अखेरची वनडे खेळली होती. भारतासाठी तो 58 कसोटी, 147 वनडे, 37 टी20 सामने खेळले आहेत. 154 आयपीएल सामन्यांमध्येही त्याची बॅट तळपली. कोलकाता नाईटरायडर्सने त्याच्या नेतृत्वात दोनवेळा आयपीएलचा किताब जिंकला.

पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान नुकताच पाक पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. आतापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही राजकारणाची वाट धरली आहे. नवज्योतसिंह सिद्धू, मोहम्मद अझरुद्दीन, मोहम्मद कैफ यासारखे क्रिकेटपटू निवडणुकीच्या रिंगणात उतरले.