अकोला : बाळापूर तालुक्यातील भारिप-बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफखान यांची हत्या झाली आहे. आसिफखान यांचा मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदीपात्रात फेकल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली आहे.


गेल्या चार दिवसांपासून आसिफखान यांच्या मृतदेहाचा शोध म्हैसांगच्या पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. मात्र अद्याप त्यांचा मृतदेह सापडलेला नाही.

आसिफखान 16 ऑगस्टच्या संध्याकाळपासून बेपत्ता होते. बेपत्ता आसिफखान यांची कार त्याच दिवशी अकोला आणि अमरावती सीमेवरील म्हैसांग येथे पूर्णा नदीच्या काठावर सापडली होती.

पोलिसांनी संशयितांना अटक करुन, तपास केला असता आसिफखान यांची हत्या झाल्याचे उघड झाले. मारेकऱ्यांनी हत्येची कबुलीही दिली आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांची नावं उघड केली नसून, हत्येमागचं कारणही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, या हत्येमागे राजकीय किंवा पैशांचा वाद आहे का? या दिशेने पोलिस तपास करत आहेत.

आसिफखान कोण होते?

आसिफखान मुस्तफाखान म्हणजे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या वाडेगाव या सर्वात मोठ्या गावातील बडं प्रस्थ. आसिफखान या वाडेगावचे पाच वर्षे सरपंचही होते. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातून भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार म्हणून तिसऱ्या क्रमांकाची मतं त्यांनी मिळवली होती. बांधकाम क्षेत्रातही आसिफखान यांनी अलिकडे जम बसवला होता.

अकोल्यात महिन्याभरात दोन नेत्यांच्या हत्या

अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात दोन वेगवेगळ्या पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या हत्या झाल्या. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद यांची हत्या झाली. त्यानंतर आता भारिप-बहुजन महासंघाचे नेते आसिफखान मुस्तफाखान यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.