Faf Du Plessis Injury: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डू प्लेसिस गंभीररित्या दुखापतग्रस्त झाला आहे. पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) सामना खेळत असताना त्याला ही दुखापत झाली आहे. तो ढाका ग्लॅडिएटर्सचे प्रतिनिधित्व करतो. काल ढाका ग्लॅडिएटर्स विरुद्ध पेशावर झाल्मी यांच्या दरम्यान सुरू असलेल्या सामन्यात फाफ क्षेत्ररक्षण करत असताना जखमी झाला. या घटनेनंतर फाफ डू ची पत्नी इमेरी विस्सरनं एक पोस्ट लिहिली आहे, जी खूप व्हायरल होत आहे. तिनं फाफचा दुखापतग्रस्त असतानाचा एक फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, हे दृश्य माझ्यासाठी जीवघेणं आहे, त्याला दवाखान्यात घेऊन गेले असावेत? असं तिनं म्हटलं आहे.


पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) सहावा हंगाम पुन्हा एकदा अबुधाबी येथे सुरू झालेला आहे.  शेख झायेद इंटरनॅशनल स्टेडियमवर ढाका ग्लॅडिएटर्स विरुद्ध पेशावर झाल्मी यांच्या दरम्यान सुरू असलेल्या सामन्यात फाफ डू प्लेसिस गंभीररित्या दुखापतग्रस्त झाला. पुढील उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असल्याची माहिती आहे.  पेशावर झाल्मी विरुद्धच्या सामन्यात पेशावर संघ फलंदाजी करत असताना प्लेसिस सातव्या षटकात क्षेत्ररक्षण करत असताना दुखापतग्रस्त झाला.




पेशावरच्या फलंदाजाने चौकाराच्या दिशेने मारलेला चेंडू अडविण्यासाठी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत असलेला प्लेसिस धावला व त्याने सूर मारत तो चेंडू अडवला. मात्र, तो तसाच पुढे पसरत गेल्याने लॉंग ऑफवरून धावत आलेल्या मोहम्मद हसनेन याच्या गुडघ्यावर त्याचे डोके आदळले. या घटनेनंतर सामना काही काळ थांबवण्यात आला. पीसीएलमध्ये आंद्रे रसेल देखील हेल्मेटवर चेंडू आदळल्याने जखमी झाला आहे.  क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड संघात सामन्यात क्वेटाकडून खेळणारा आंद्रे रसल इस्लामाबादच्या मुसा खान विरुद्ध फलंदाजी करताना हेल्मेटवर चेंडू आदळल्याने जखमी झाला. डाव संपल्यानंतर रसेलला कन्कशनचा त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात दाखल केले गेले.