मुंबई : क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराला गुड न्यूज मिळाली आहे. पुजाराच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बायको पूजा आणि नन्ह्या परीसोबतचा फोटो चेतेश्वरने ट्विटरवर शेअर केला आहे.


गुरुवारी चेतेश्वरची पत्नी पूजा डाबरी हिने बाळाला जन्म दिला. त्यावेळी पुजारा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत होता. गुड न्यूज मिळताच त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. ट्विटरवरुन त्याने ही बातमी चाहते आणि मित्र परिवारासोबत शेअर केली.

'छोटुकलीचं स्वागत. आयुष्यात नवीन भूमिका साकारायला मिळत असल्यामुळे आम्ही दोघंही आनंदी आणि उत्साही आहोत. आम्ही मनात इच्छा बाळगली आणि ती पूर्ण झाली' असं ट्वीट पुजाराने केलं आहे.


फेब्रुवारी 2013 मध्ये चेतेश्वरने गर्लफ्रेण्ड पूजासोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या पाचव्या वाढदिवसालाही चेतेश्वरने आपल्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन होणार असल्याचं सांगितलं होतं.

क्रिकेटपटू हरभजन सिंहने चेतेश्वर आणि पूजा यांचं अभिनंदन केलं. भज्जीने बाळ, बाळंतीण आणि बाळाचे बाबा अशा तिघांनाही सुदृढ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.