कर्णधार असताना धोनीला मैदानात पंच किंवा सामन्यानंतर पत्रकारांशी हुज्जत घालताना अनेकदा पाहिलं असेल. कधी-कधी त्याने आपल्या खेळाडूंवरही राग काढला. मात्र कर्णधारपद सोडल्यापासून तो आपल्या खेळाडूंवरच जास्त चिडत असल्याचं दिसून आलं आहे. 2017 नंतर अनेकदा तो खेळाडूंवर ओरडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं.
बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने 19.1 षटकामध्ये 171 धावा केल्या होत्या. त्यावेळी धोनी आणि मनीष पांडे खेळत होते. दोन्ही फलंदाज तुफान फटकेबाजी करत होते. 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मनीष पांडेने फटकावलेल्या चेंडूवर धोनीने दोन धावांचा कॉल दिला. मात्र, मनीष पांडेने त्याकडे लक्ष न देता आरामात एकेरी धाव घेतली. यामुळेच धोनी त्याच्यावर भडकला.
कायम शांत आणि संयमी असणाऱ्याने धोनीने यावरुन भर मैदानाताच पांडेला सुनावलं. 'उधर क्या देख रहा है, इधर देख ले.' अशा शब्दातच धोनीने त्याला सुनावलं. धोनीचा हा आक्रमकपणा पाहून पांडेही काही काळ भांबावून गेला होता. पण आपली चूक झाल्याचंही त्यावेळी त्याच्या लक्षात आलं.
गेल्या वर्षीही असंच काहीसं घडलं होतं, एक वेळा नाही, तर चार-चार वेळा अशा घटना घडल्या. 2017 मध्ये धोनी जेव्हा कर्णधार नसताना मैदानात उतरला तेव्हा त्याच्या निशाण्यावर आपल्याच संघातील खेळाडू होते.
पहिला नंबर यजुवेंद्र चहलचा
यजुवेंद्र चहल धोनीच्या निशाण्यावर सर्वात अगोदर आला. त्याच सामन्यात चहलने टी-20 क्रिकेटमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम केला होता. चहलच्या चेंडूवर इंग्लंडचे फलंदाज ज्यो रुट आणि जेसन रॉय धाव घेण्याच्या तयारीत होते. मात्र दोघांमध्ये संवादाचा अभाव आला आणि ते गोंधळले. गोंधळलेले दोन्ही फलंदाज एकाच बाजूला गेले. चेंडू चहलच्याच हातात आला, मात्र त्याने तो धोनीकडे फेकला जिथे, फलंदाज सुरक्षित होते. जेसन रॉय इथे वाचला आणि त्याने 23 चेंडूत 32 धावांची खेळी केली. मात्र चहलने ही संधी गमावल्यामुळे धोनी त्याच्यावर चांगलाच संतापला.
यानंतरही धोनीच्या निशाण्यावर पुन्हा एकदा चहलच आला. चहलचा चेंडू जेव्हा फ्लाईट होत नव्हता, तेव्हा धोनीने त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं, ‘की गोलंदाजी करता येत नसेल, तर तसं सांगून दे’.
दुसरा नंबर केदार जाधवचा
चहलनंतर केदार जाधवचा नंबर आला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताची परिस्थिती खराब होती. चार विकेट पडलेल्या असताना धुरा सांभाळण्याची जबाबदारी धोनीकडे होती. साथीला असलेल्या केदार जाधवने धोनीला जवळपास धावबादच केलं होतं. अचानक धाव घेण्यापासून रोखल्याने धोनीचं संतुलन बिघडलं. त्यानंतरही धोनी थांबला नाही आणि त्याने जोखिम घेत धाव पूर्ण केली. धाव घेण्यासाठी का पळाला नाही, असं त्याने केदार जाधवला विचारलं. पळायचं नव्हतं, तर मला अगोदरच सांगायचं, असं धोनी म्हणाला.
कुलदीप आणि पंड्याही निशाण्यावर
गेल्या काही महिन्यांपासून धोनी स्टम्पच्या मागून जास्त सक्रिय दिसतो. विराट कोहलीने कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यापासून क्षेत्ररक्षणाची जबाबदारी त्याने घेतली आहे. स्टम्पच्या मागूनच धोनी गोलंदाजांना सल्ला देतो. मात्र कुणी चुकल्यास त्याला प्रेमळ शब्दात समजावून सांगणंही धोनी विसरत नाही. कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्याही अनेकदा धोनीच्या रडारवर आले आहेत. मात्र त्याच वेळेला धोनी समजावूनही सांगतो.
दरम्यान, मनीष पांडेला ओरडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी धोनीवर टीका केली, तर सिनिअर खेळाडू म्हणून धोनीच्या ओरडण्याचंही काहींनी समर्थन केलं आहे. खेळाच्या मैदानावर शिवीगाळ किंवा वाद हा नवीन प्रकार नाही. त्यामुळे धोनीने त्याच्या ज्युनिअर खेळाडूला चूक दाखवून देणं योग्यच होतं, असं काहींचं म्हणणं आहे.
मनीष पांडेवर धोनी चिडला