ZIM vs IND: इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या संघाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत केल्यानंतर भारतीय एकदिवसीय संघ (Team India) झिम्बाब्वे दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत झिम्बाब्वेशी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. येत्या 18 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेला काहीच दिवस शिल्लक असताना बीसीसीआयनं (BCCI) भारतीय संघात मोठा बदल केलाय. या दौऱ्यात शिखर धवन (Shikhar Dhawan) भारतीय संघाचं नेतृत्व करणार होता. पण केएल राहुल (KL Rahul) दुखापतीतून सावरल्यानं बीसीसीआयनं त्याच्याकडं भारतीय संघाची धुरा सोपवली आहे.


झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी बीसीसीआयनं एकदिवसीय संघाची घोषणा केली होती. ज्यात शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करणार असल्याची माहिती दिली. परंतु, बीसीसीआयनं नुकतीच दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुल भारतीय संघाचा कर्णधार असेल. तर, शिखर धवन उपकर्णधारपदाची जबाबदारी संभाळणार आहे. बीसीसीआयच्या निर्णयावर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाल आतापर्यंत एकही सामना जिंकता आला नाही. तर, शिखर धवनच्या नेतृत्वात भारतानं श्रीलंका आणि वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे.


उत्कृष्ट कर्णधार कोण?
बीसीसीआयनं केएल राहुलकडं तिन्ही फॉरमेटच्या उप कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली आहे. महत्वाचं म्हणजे, केएल राहुलनं चार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यापैकी भारताला एकही सामना जिंकता आला नाही. ज्यात एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्याचा समावेश आहे. दुसरीकडं शिखर धवननं सहा एकदिवसीय सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. ज्यापैकी पाच सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. याशिवाय टी-20 क्रिकेटमध्येही शिखर धवननं तीन सामन्यात भारताचं नेतृत्व केलंय. यातील एक सामना भारतानं जिंकला आहे. तर, दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. 


कर्णधार म्हणून शिखर धवनची कामगिरी
धवननं यावर्षी जुलै महिन्यात पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व केलंय. नुकतंच त्यानं वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारताची धुरा संभाळली होती. या मालिकेत भारतानं वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप दिला. तर, शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंका विरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारतानं 2-1 नं मालिका जिंकली होती. 


केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी
केएल राहुलनं या वर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच भारतीय संघाचं जबाबदारी खाद्यावर घेतली होती. या एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुलनं भारतीय कसोट संघाचं नेतृत्व केलं होतं. या सामन्यातही भारताला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. फेब्रुवारी महिन्यापासून भारतानं कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.


हे देखील वाचा-