Yuvraj Singh retirement anniversary: भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंहनं 10 जून 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. दरम्यान, निवृत्तीच्या तीन वर्षांनंतर युवराज सिंहनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत युवराज सिंह भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी त्यानं आपली क्रिकेट कारकिर्द, सहकारी खेळाडू आणि निवृत्ती घेतल्यानंतरचं त्याचं आयुष्य, या सर्व गोष्टींवर भाष्य केलंय. 


युवराज सिंह काय म्हणाला?
हा व्हिडिओ शेअर करत युवराजनं कॅप्शनमध्ये असं लिहलं आहे की, “आज मला क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन तीन वर्षे झाली आहेत. पण तुमचं माझ्यावरचं प्रेम अजूनच वाढलंय. मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल आणि हा सुंदर व्हिडिओ बनवल्याबद्दल माझे मित्र, कुटुंब आणि चाहते यांचे खूप खूप आभार. तुमचं प्रेम आणि आपुलकी अमूल्य आहे.”



युवराज सिंहचं दमदार प्रदर्शन
युवराज सिंहनं 2000 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2000 पासून 2019 मध्ये त्यानं अनेक विक्रम आपल्या नावावर केले. युवराज सिंह हा अंडर-19 वर्ल्डकप, चॅम्पियन ट्रॉफी, आशिया कप, एकदिवसीय वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप, टी10 आणि आयपीएलचा खिताब जिंकणारा एकमेव खेळाडू आहे. त्यानं एकट्याच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळं त्याला भारतीय क्रिकेट संघाचा मॅच विनर म्हणून ओळखलं जात होतं. 


युवराज सिंहनं एकट्याच्या जोरावर भारताला 2007 चा टी-20 आणि 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला होता. कॅन्सरमुळं युवराजला बरेच दिवस क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. मात्र, कॅन्सरशी लढा जिंकून त्यानं क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आणि अनेकांसाठी तो आदर्श ठरला. त्यानं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडिजविरुद्ध जून 2017 मध्ये खेळला होता.


हे देखील वाचा-