2022 Test Cricket top-5 run scorer: क्रिकेटमध्ये म्हटलं तर कसोटी फॉरमॅटला सर्वोच्च दर्जा आजही दिला जातो. टी20 क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जात असलं तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एकूण 12 देशांना कसोटी खेळण्याचा दर्जा दिला आहे, ज्यांना पूर्ण सदस्य म्हटलं जाते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज झले आहेत. त्याचबरोबर या वर्षीही अनेक महान फलंदाज या फॉरमॅटमध्ये पाहायला मिळाले आहेत. यामध्ये इंग्लिश फलंदाज जो रूट 2022 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांबद्दल जाणून घेऊया...


1. जो रूट


2022 वर्षात इंग्लंडचा माजी कर्णधार फलंदाज जो रूट यंदा कसोटी क्रिकेटमध्ये एका वेगळ्याच लयीत दिसला आहे. यावर्षी त्याच्या बॅटमधून एकूण 5 शतकं आणि दोन अर्धशतकं झळकली आहेत. यामध्ये 176 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. रुटने 2022 मध्ये 13 सामन्यांच्या 24 डावांमध्ये 50.90 च्या सरासरीने 1069 धावा केल्या आहेत.


2. जॉनी बेअरस्टो


दुसऱ्या क्रमांकावरही इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टो आहे. या वर्षात आतापर्यंत त्याने 10 सामन्यांच्या 19 डावांमध्ये 66.31 च्या सरासरीने 1061 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 162 धावांची आहे.


3. उस्मान ख्वाजा


यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 9 कसोटी सामन्यांच्या 16 डावात 85.80 च्या सरासरीने 1021 धावा केल्या आहेत. पाचही फलंदाजांमध्ये ही सरासरी सर्वाधिक आहे. यादरम्यान त्याने 4 शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 160 धावा आहे.


4. मार्नस लाबुशेन


नुकताच कसोटी क्रिकेट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आलेला ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन या वर्षी कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 9 सामन्यांच्या 15 डावात 62.07 च्या सरासरीने 807 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 3 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या 204 धावा आहे, जी नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने बनवली होती.


5. बाबर आझम


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट लयीत दिसला आहे. त्याने आता 6 सामन्यांच्या 11 डावात 72.81 च्या सरासरीने 801 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या 196 आहे.


हे देखील वाचा-