WTC Points Table Latest Update : ऑस्ट्रेलियातील सध्याची परिस्थिती पाहता कांगारू संघ अडचणीत सापडले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आधी ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर तिकडे साऊथ आफ्रिका जिंकली आणि इकडे ऑस्ट्रेलिया मोठा दणका बसला.  

शुक्रवारी, दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 233 धावांनी दणदणीत विजय नोंदवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत उलथापालथ केली. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघाने जितकी मोठी झेप घेतली, तितकीचा मोठा धक्का श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियासाठी होता.

दक्षिण आफ्रिकेचा संघ आता डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत भारतानंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, असे असतानाही श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम आहे. जर आपण डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलच्या सध्याच्या स्थितीवर नजर टाकली तर, भारतीय क्रिकेट संघ 15 पैकी 9 कसोटी सामने जिंकून सर्वाधिक 61.11 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ 9 कसोटीत 5 विजयांसह 59.26 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलियासह श्रीलंकेलाही मोठा धक्का 

दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे. 13 कसोटीत 8 विजय मिळवून ऑस्ट्रेलियाचे 57.69 गुण आहेत. श्रीलंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या विजयानंतर डब्ल्यूटीसीची शर्यत श्रीलंकेसाठी खूपच कठीण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवापूर्वी श्रीलंकेचा संघ डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता, मात्र आता ते पाचव्या स्थानावर गेला आहेत.

टीम इंडियाला बसला नाही कोणाता फटका...

भारतीय क्रिकेट संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असला तरी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाला खूप मेहनत करावी लागणार आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली सुरुवात केली असून पर्थ कसोटी सामन्यातही दमदार विजय संपादन केला आहे, मात्र टीम इंडियाला मालिकेत अजून चार सामने खेळायचे आहेत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलवर तिसऱ्या स्थानावर पोहोचल्यानंतर ऑस्ट्रेलिया ॲडलेड कसोटीत दमदार विजय मिळविण्यासाठी उत्सुक असेल.

टीम इंडियासाठी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खूप महत्त्वाची

ही बॉर्डर गावसकर ट्रॉफी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण या मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 4-1 ने पराभूत केले नाही, तर भारताला WTC साठी पात्र होण्यासाठी इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.