WTC Final Ind vs Aus: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यात टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियानं ऑस्ट्रेलियन संघाचा 2-1 असा पराभव केला, त्यामुळे तो नव्या उत्साहानं मैदानात उतरणार आहे. तसेच, इंग्लिश परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करणं सोपं होणार नाही.

चाहत्यांच्या नजरा कोहली-स्मिथवर खिळल्यात 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात सर्वांच्या नजरा दोन दिग्गज खेळाडूंवर खिळल्या आहेत. ते दिग्गज खेळाडू म्हणजे, टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohali) आणि दुसरा ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ. WTCच्या अंतिम सामन्यात कोहली आणि स्मिथ आपापल्या संघासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. या अंतिम सामन्यात या दोन्ही फलंदाजांना मोठा विक्रम करण्याची संधी आहे. 

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली या दोघांनीही प्रत्येकी 8-8 शतकं झळकावली आहेत. सध्या दोन्ही खेळाडू टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्यामध्ये रिकी पॉटिंग आणि टीम इंडियाचे माजी स्टार फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासोबत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अशातच विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याकडे रिकी पॉटिंग आणि सुनील गावस्कर यांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर कब्जा करण्याची संधी आहे. त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की, स्मिथ आणि कोहली दोघांपैकी कोण पॉटिंग-गावस्कर यांना मागे टाकणार? 

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक (11) शतकं झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. विराट कोहलीनं यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचं कसोटी शतक झळकावलं होतं. कोहलीला आता सलग दुसरं शतक झळकावण्याची संधी आहे.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीत सर्वाधिक शतकी खेळी

फलंदाजाचं नाव सामने धावा आणि शतक 
सचिन तेंडुलकर (टीम इंडिया) 39 3630 धावा, 11 शतकं
सुनिल गावस्कर (टीम इंडिया) 20 1550 धावा, 8 शतकं
स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 18 1887 धावा, 8 शतकं
विराट कोहली (टीम इंडिया) 24 1979 धावा, 8 शतकं
रिकी पॉटिंग (ऑस्ट्रेलिया) 29 2555 धावा, 8 शतकं

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसी (WTC) अंतिम सामन्यातही राखीव दिवस (12 जून) ठेवण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिलं स्थान पटकावलं आणि टीम इंडियानं दुसरं स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर आयसीसी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या तर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. अव्वल-2 संघांमधील अंतिम सामन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

WTC चा अंतिम सामना जिंकून टीम इंडियाला गेल्या 10 वर्षांपासूनचा 'आयसीसी ट्रॉफी'चा दुष्काळ संपवायचा आहे. 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं शेवटची ICC ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत यजमान इंग्लंडचा पराभव केला. त्यानंतर टीम इंडिया कोणत्याही आयसीसी स्पर्धेत चॅम्पियन बनलेली नाही. त्यामुळे यंदाच्या WTC फायनलमध्ये 'आयसीसी ट्रॉफी'चा दुष्काळ संपवण्याचा टीम इंडिया पूरेपूर प्रयत्न करणार आहे. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याचे डिटेल्स 

• तारीख : 7 ते 11 जून, 2023 
• ठिकाण : द ओवल मैदान, लंडन 
• संघ : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया 
• रिझर्व डे : 12 जून

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

WTC Final Ind vs Aus: ओव्हलमध्ये टीम इंडिया रेकॉर्ड खूपच खराब; सोपं नाही WTC जिंकणं, आकडे काय सांगतात?