WTC Final: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) भिडणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील (London) ओव्हल मैदानावर (Oval Ground) 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर असून कांगारूंचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) अंतिम सामना अत्यंत रंगतदार होणार हे मात्र नक्की.
ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणं टीम इंडियासाठी सोप्पं नसेल. या मैदानावर रोहित ब्रिगेडचा कसोटी रेकॉर्ड चांगला नाही. टीम इंडियानं या मैदानावर एकूण 14 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात केवळ 2 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत. तर 7 सामने अनिर्णित राहिले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्डही फारसा चांगला नाही
ओव्हलच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्डही योग्य नाही आणि त्यानं 38 पैकी केवळ 7 सामनं जिंकले आहेत, तर 17 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं तर, दोन्ही संघांनी 106 सामने खेळले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियानं 44 सामने जिंकले आहेत, तर टीम इंडियानं 32 सामने जिंकले आहेत. याशिवाय दोघांमध्ये 29 सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे.
त्यातल्यात्यात दिलासादायक बाब म्हणजे, टीम इंडियानं ओव्हलवरील शेवटचा सामना जिंकला होता. सप्टेंबर 2021 मध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वात इंग्लडला टीम इंडियानं 157 धावांनी हरवलं होतं. याच सामन्यात रोहित शर्मानं 127 धवांची शतकी खेळी केली होती. या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा खिताब रोहितला देण्यात आला होता.
टीम इंडियाला अंतिम सामना जिंकून 'आयसीसी ट्रॉफी'चा गेल्या 10 वर्षांपासूनचा दुष्काळ संपवायचा आहे. 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं शेवटची ICC ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत टीम इंडियानं इंग्लंडचा पराभव केला होता. त्यानंतर मात्र टीम इंडिया आयसीसी स्पर्धेत चॅम्पियन होऊ शकलेली नाही. जर टीम इंडियानं कांगारूंच्या संघावर मात करुन जेतेपद मिळवलं, तर मात्र तब्बल 10 वर्षांपासून दुष्काळ संपवून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा खिताब पटकावेल.
टीम इंडियाला 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक (2015) आणि टी-20 विश्वचषक (2016) च्या उपांत्य फेरीतही टीम इंडियाचा पराभव झाला. चॅम्पियन्स ट्रॉफी (2017), वर्ल्ड कप (2019) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (2021) मध्येही टीम इंडियाची अशीच परिस्थिती होती. याशिवाय 2021 आणि 2022 चा टी-20 विश्वचषकही टीम इंडियासाठी निराशाजनक होता.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे रिकॉर्ड्स (ओव्हलमध्ये)
• टीम इंडिया : 14 टेस्ट, 2 विजय, 5 पराभव, 7 ड्रॉ
• ऑस्ट्रेलिया : 38 टेस्ट, 7 विजय, 17 पराभव, 14 ड्रॉ
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी
एकूण सामने : 106
टीम इंडियानं जिंकले : 32
ऑस्ट्रेलियानं जिंकले : 44
ड्रॉ सामने : 29
टाई : 01
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याचे डिटेल्स
• तारीख : 7 ते 11 जून, 2023
• ठिकाण : द ओवल मैदान, लंडन
• संघ : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
• रिझर्व डे : 12 जून
WTC च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया स्क्वॉड
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (विकेटकीपर), केएस भरत (विकेकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट
स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जायसवाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव