WTC Final, India vs Australia : सध्या क्रिकेट चाहत्यांना जागतिक कसोटी विजेतेपद म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) चं वेध लागलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा (WTC Final 2023) अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. ओव्हल येथे 7 जूनपासून ही लधत सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी (World Test Championship)अद्याप टीम इंडियाच्या प्लेइंग 11 बाबत संभ्रम कायम आहे.


टीम इंडियाकडून कुणाला संधी मिळणार?


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघांची जोरदार तयारी सुरु आहे. दोन्ही संघांचे खेळाडू इंडियन प्रीमियरमध्ये खेळताना दिसले, आता ते कसोटीच्या फॉरमॅटमध्ये खेळतील. दरम्यान, टीम इंडियाला एकीकडे दुखापतींचं ग्रहण लागलं असताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध मैदानावर नेमकं कोण उतरणार यावर अजूनही चर्चा सुरु आहे. त्यामुळे टीम इंडियाकडून कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागेल.


अश्विन की शार्दुल ठाकूर?


फायनल आधी प्लेइंग 11 मध्ये रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. इंग्लंडच्या वेगवान खेळपट्टीवर अश्विनच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळावी, असं अनेक दिग्गज क्रिकेटपटू आणि समिक्षकाचं मत आहे. तर, दुसरीकडे, अश्विनसारख्या गोलंदाजाला खेळपट्टीच्या मदतीची गरज नसते. अश्विन कोणत्याही खेळपट्टीवर फलंदाजांवर भेदक मारा करू शकतो, असंही काहीचं मत आहे. 


ऑस्ट्रेलियाविरोधात अश्विनचा पराक्रम


दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंविरोधात अश्विनची ​​आकडेवारी पाहता, त्याचं पारड जड दिसून येत आहे. अश्विनचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड दमदार आहे. त्याने कांगारूंविरुद्ध 22 सामन्यांत 114 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर त्याने 543 धावाही केल्या आहेत. यामध्ये 62 धावांच्या सर्वोत्तम खेळीचा समावेश आहे. अश्विनने सात वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.


वॉर्नर-स्मिथविरुद्ध शानदार रेकॉर्ड


सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघात समाविष्ट असलेल्या फलंदाजांविरुद्ध अश्विननं विक्रमी कामगिरी केली आहे. अश्विनने स्टीव्ह स्मिथला आठ वेळा बाद केले आहे. त्याने डेव्हिड वॉर्नरला 11 वेळा बाद केले असून फक्त केवळ 194 धावा दिल्या आहेत. त्याने उस्मान ख्वाजाला चार वेळा बाद केलं आहे. तर, अॅलेक्स केरीला फक्त 25 धावा देत पाच वेळा बाद केलं आहे. 


इंग्लंडमध्येही अश्विनचा दमदार रेकॉर्ड


इंग्लंडच्या खेळपट्टीवरही अश्विनचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने सात कसोटीत 18 विकेट्स घेतल्या असून 261 धावा केल्या आहेत. नाबाद 46 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियन संघातील चार प्रमुख फलंदाज डावखुरे आहेत आणि यांच्यासमोर अश्विन सर्वोत्तम पर्याय आहे. अश्विनविरुद्ध फक्त ट्रॅव्हिस हेडची सरासरी 25 पेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत अश्विन भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


WTC Final 2023 : टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चा पेच कायम, अश्विन की उमेश कुणाला मिळणार संधी?