Travis Head Century: ओव्हलवर सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेड याने शतकी खेळी केली. तो अशी कामगिरी करणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.  लंडनमधील ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात हेड याने दमदार फलंदाजी करत भारताची डोकेदुखी वाढवली. हेड याने 100 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधील हे पहिलेच शतक होय. 


भारताने तीन विकेट झटपट घेत चांगली सुरुवात केली होती. पण स्मिथ आणि हेड यांनी दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. हेड याने 15 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शतकी खेळी केली. तर स्मिथ याने अर्धशतक झळकावले. चौथ्या विकेटसाठी या जोडीने दीडशतकी भागिदारी केली. 


हेडचा विक्रम - 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये शतक झळकवणारा ट्रेविस हेड पहिलाच फलंदाज ठरलाय.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा हा दुसरा हंगामा आहे. 2001 मध्ये पहिला हंगाम पार पडला होता. यामध्ये न्यूझीलंड संघाने बाजी मारली होती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या फायनल सामन्यात एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते. अशात हेडने भारताविरुद्ध शतक ठोकत इतिहास रचला आहे. हेड डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.  






इतिहास कोण घडवणार ?


भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये जागतिक कसोटी विजेतेपदासाठी चुरस सुरु झाली आहे.  दोन बलाढ्य संघांमध्ये फायनलची लढत लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगली आहे. या अगोदर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत आयसीसी अंडर-19, टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकांसह चॅम्पियन्स कपही जिंकलेला आहे. दोन्ही देशांकडे आयसीसीच्या सर्वाधिक 11-11 ट्रॉफी आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल जिंकून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळविण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर कौशल्यपणाला लावण्यासाठी आतूर झाले आहेत. त्यामुळे कसोटी जिंकून भारत इतिहास घडविणार की ऑस्ट्रेलिया? याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. 


ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतांना ओव्हलवर श्रद्धांजली, भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात!