Rishabh Pant Wicket Controversy Ind vs nz 3rd test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने भारताला 147 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. मात्र, ऋषभ पंतने भारतीय फलंदाजीची धुरा सांभाळत 64 धावांचे शानदार अर्धशतक झळकावले. पण ऋषभ पंतच्या विकेटवरून गदारोळ पाहिला मिळाला.






तिसऱ्या दिवशी ऋषभ पंतची विकेट पडल्यानंतर मोठा गदारोळ पाहिला मिळाला. आऊट नसताही कॅचच्या आवाहनावर तिसऱ्या पंचाने त्याला आऊट दिल्याचा दावा केला जात आहे. त्यावेळी पंतही पंचांच्या निर्णयावर नाराज दिसत होता. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने रागाच्या भरात ड्रेसिंग रूमच्या दरवाज्यावर जोरात बॅट मारली. त्याचबरोबर सुनील गावसकर आणि एबी डिव्हिलियर्स यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनीही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. दरम्यान पंत मैदानावर असलेल्या पंचांशी या निर्णयावर चर्चा करताना दिसला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नसल्याचा दावा त्याने केला.






खरंतर, 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 29 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. यानंतर पंतने रवींद्र जडेजासोबत भारतीय डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. जडेजा सहा धावा करून बाद झाला. यानंतर पंतने सलग दुसरे अर्धशतक आणि कसोटी कारकिर्दीतील 14वे अर्धशतक झळकावले. त्याने 48 चेंडूत पन्नास धावा पूर्ण केल्या. न्यूझीलंड आणि विजय यांच्यामध्ये फक्त पंत उभा होता. एकीकडे इजाज विकेट घेत होता तर दुसरीकडे पंत आक्रमक खेळत होता. 22व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पंतने शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या पॅडला लागला आणि खेळाडूच्या हातात गेला.






ऑनफिल्ड अंपायरने पंतला नाबाद दिले. यावर न्यूझीलंडने रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायर पॉल रायफल यांनी रिप्लेमध्ये पाहिले की चेंडू बॅटजवळून गेल्याने स्निकोमीटरमध्ये स्पाइक्स दिसत होते. मात्र, त्याचवेळी पंतची बॅटही पॅडला लागली होती. रायफलने अनेक वेळा रिप्लेमध्ये पाहिले. यादरम्यान पंत मैदानावरील पंचांना सांगत होता की बॅट पॅडला लागली आहे. मात्र, तिसऱ्या पंचाने आऊट घोषित केल्याने पंतला माघारी जावे लागले. पंतने 57 चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 64 धावांची खेळी केली. त्याची बाद हा टर्निंग पॉइंट ठरला आणि मग बाकीचा संघही कोसळला. आता सोशल मीडियावर अंपायरिंगवर टीका करत आहे.