India vs New zealand World Cup 2023 : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 2019 च्या विश्वचषकात झालेला अंतिम सामना सर्व क्रिकेट रसिकांना आठवत असेल. फायनलचा सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पण तिथेही दोन्ही संघाची धावसंख्या समान झाली. त्यामुळे नियमांनुसार, चौकारांच्या संख्येवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे मेहनत केल्यानंतर न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे या निर्णयावर अनेक आजी माजी खेळाडूंनी टीका केली होती. त्यामुळे यंदाही उपांत्य आणि अंतिम फेरीत अशी स्थिती निर्माण झाली तर काय नियम असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. गेल्यावर्षी या नियमांमुळे वादंग झाल्यानंतर आयसीसीने या नियमांत बदल केला आहे.
2019 मध्ये काय झालं होतं ?
2019 वर्ल्डकपमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पण सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघाची धावसंख्या समान झाली. त्यानंतर बाउंड्री काउंटच्या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे इंग्लंडने पहिल्यांदा वनडेचे विश्वविजेतेपद जिंकले, तर न्यूझीलंड उपविजेते राहिले. मात्र या सामन्यानंतर बाउंड्री काउंटच्या नियमावर प्रचंड टीका झाली, अखेर हा नियम बदलण्यात आला.
सामना बरोबरीत सुटल्यास विजेता कोण ? आयसीसीचा नियम काय सांगतो -
वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी आयसीसीने यंदा सुपर ओव्हरचा नियम ठेवला आहे. उपांत्य फेरीत जर सामना बरोबरीत सुटला अथवा टाय झाला तर सुपर ओव्हरमधून विजेता ठरवण्यात येईल. सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला तर पुन्हा सुपर ओव्हर केली जाईल. जोपर्यंत विजेता मिळत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर होतच राहील. 2019 विश्वचषकात सामना बरोबरीत सुटल्यानंतर चौकारांच्या संख्येवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे आयसीसीवर टीका झाली होती. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात नियमात बदल करण्यात आलाय.
उपांत्य फेरीचा थरार -
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा पहिला सामना होत आहे. 15 नोव्हेंबर रोजी वानखेडेच्या स्टेडिअयमवर या दोन संघामध्ये लढत होणार आहे. तर 16 नोव्हेंबर रोजी आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा दुसरा सामना होतोय. या दोन्ही सामन्यातील विजेते संघ 19 नोव्हेंबर रोजी भिडणार आहेत.
भारताचे पारडे जड -
भारतीय संघ मजबूत दिसतोय. साखळी फेरीत टीम इंडिया आतापर्यंत अजेय आहे. भारताने सर्वच नऊ सामन्यात विजय मिळवलाय. फलंदाजीसह गोलंदाजीतही धमक दाखवली आहे. विराट, रोहित अन् अय्यर यांच्यासह इतर फलंदाजांनीही धावा चोपल्यात. तर गोलंदाजीत बुमराह, शामी, सिराज, कुलदीप आपली कामगिरी चोख बजावत आहे. जाडेजा अष्टपैलूची जबाबदारी पार पाडतोय. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जातेय. न्यूझीलंडला साखळीतील नऊ सामन्यात पाच विजय मिळवता आलाय. त्यांना चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव केला होता. त्याशिवाय ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केलाय.