Jay Shah : श्रीलंका क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रणतुंगा म्हणाले की, जय शाह यांचा श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर प्रभाव आहे. त्यांच्या संगनमतानेच श्रीलंकेच्या क्रिकेटची दुरवस्था झाली आहे. श्रीलंकेचा संघ भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषकात 9 पैकी 7 साखळी सामने हरला आणि 10 संघांमध्ये 9व्या स्थानावर राहिला. श्रीलंकेला उपांत्य फेरीला मुकावे लागले आणि 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकलेला नाही.






1996 मध्ये श्रीलंकेला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा म्हणाले की, श्रीलंकेचे क्रिकेट जय शाह चालवतात. जय शाह यांच्या दबावामुळे आमचे क्रिकेट बोर्ड बरबाद होत आहे. एक भारतीय माणूस श्रीलंकेचे क्रिकेट उद्ध्वस्त करत आहे.


श्रीलंका क्रिकेट बोर्डात गोंधळ सुरुच 


विश्वचषकात श्रीलंकेच्या खराब कामगिरीनंतर क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी 6 नोव्हेंबर रोजी श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केले होते. अंतरिम मंडळही स्थापन करण्यात आले. अर्जुन रणतुंगा यांची नवीन अंतरिम मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. क्रीडामंत्र्यांच्या आदेशानंतर श्रीलंकन ​​क्रिकेट बोर्डाला कोर्टात जावे लागले. बोर्डाच्या अपिलावर न्यायालयाने क्रीडामंत्र्यांचा देशाचे क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय रद्द केला. म्हणजे रणतुंगा हे अंतरिम अध्यक्ष होऊ शकले नाहीत.


ICC कडून  श्रीलंका क्रिकेट बोर्ड निलंबित 


श्रीलंका क्रिकेट बोर्डाला (SLC) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी (10 नोव्हेंबर) निलंबित केलं आहे. बोर्डात सरकारच्या हस्तक्षेपानंतर आयसीसीने तत्काळ प्रभावाने त्यांचे सदस्यत्व काढून घेतले.






रणतुंगा हे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष 


अर्जुन रणतुंगा 1982 ते 2000 म्हणजेच 18 वर्षे श्रीलंकेकडून खेळले. निवृत्तीनंतर ते क्रिकेट प्रशासकही झाले. 2008 ते 2009 पर्यंत ते श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते. रणतुंगा राजकारणातही सक्रिय आहेत. श्रीलंका सरकारमध्ये त्यांनी चार मंत्रीपदेही भूषवली आहेत. 2018-19 मध्ये त्यांचा मंत्री म्हणून शेवटचा कार्यकाळ होता. तेव्हा ते श्रीलंकेचे नागरी विमान वाहतूक मंत्री होते.


बीसीसीआय आणि एसएलसीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही


रणतुंगाच्या आरोपांवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भारतीय क्रिकेट बोर्डाला जगभरातील क्रिकेट संघटनांवर वर्चस्व गाजवायचे आहे, असा आरोप रणतुंगाने यापूर्वीही अनेकदा केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या