World Cup 2023 Points Table Update: इंग्लंडनं नेदरलँड्सचा 160 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत दुसऱ्या विजयाची नोंद केली. नेदरलँड्सचे विश्वचषकातील आव्हान आज संपुष्टात आलेय. त्याशिवाय श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लंड यांचे आव्हान अधीच संपुष्टात आले होते. इंग्लंडने नेदरलँड्सचा पराभव करत गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतली आहे. त्यासह इंग्लंडने स्वतःला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या शर्यतीत कायम ठेवले आहे. पराभूत झालेल्या नेदरलँड दहाव्या स्थानी घसरलाय.
तीन संघ निश्चित, एका स्थानासाठी स्पर्धा -
भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केलाय. चौथ्या स्थानावर तीन संघामध्ये स्पर्धा आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये चौथ्या क्रमांकासाठी लढत आहे. या तीन संघापैकी दोन संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. उपांत्य फेरती कोणता संघ पोहचणार.. याकडे लक्ष लागलेय.
नेटरनरेटमध्ये न्यूझीलंडचा संघ इतर दोन्ही संघाच्या तुलनेत पुढे आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट + ०.398 आहे. न्यूझीलंडला अखेरचा सामना बेंगलोरमध्ये श्रीलंकेशी होणार आहे. लंकेचे आव्हान संपुष्टात आलेय, ते न्यूझीलंडला अडचणीत आणू शकतात. बेंगलोरमध्ये पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तान + 0.036) आणि अफगाणिस्तान - 0.038) असा नेट रनरेट आहे.
इंग्लंडची गुणतालिकेत मोठी झेप -
नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव करत इंग्लंडने गुणतालिकेत थेट सातव्या स्थानी झेप घेतली. इंग्लंडला आठ सामन्यात सहा पराभवाचा सामना करावा लागला. दोन विजयासह इंग्लंड संघाने गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतली. इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका आणि नेदरलँड्स यांचे समान गुण आहेत. पण इंग्लंडचा नेट रनरेट चांगलाय. त्यामुळे ते सातव्या क्रमांकावर आहेत. बांगलादेश आठव्या, श्रीलंका नवव्या आणि नेदरलँड दहाव्या स्थानी आहे.
इंग्लंडचा विश्वचषकातील दुसरा विजय -
इंग्लंडनं नेदरलँड्सचा 160 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत दुसऱ्या विजयाची नोंद केली. इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळं त्या दोन संघांमधला सामना ही निव्वळ औपचारिकता होती. पुण्यातल्या या सामन्यात इंग्लंडनं नेदरलँड्सला विजयासाठी 50 षटकांत 340 धावांचं आव्हान दिलं होतं. पण इंग्लंडच्या प्रभावी आक्रमणासमोर नेदरलँड्सचा अख्खा डाव 179 धावांत गडगडला. इंग्लंडच्या मोईन अली आणि आदिल रशिदनं प्रत्येकी तीन, तर डेव्हिड विलीनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी, बेन स्टोक्सचं शतक आणि ख्रिस वोक्सच्या अर्धशतकच्या जोरावर इंग्लंडनं 50 षटकांत नऊ बाद 339 धावांची मजल मारली होती. बेन स्टोक्सनं 84 चेंडूंत 108 धावांची आणि ख्रिस वोक्सनं 45 चेंडूंत 51 धावांची खेळी उभारली.