World Cup 2023 Points Table Update : पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका या विश्वचषक विजेत्या संघाचा पराभव करत अफगाणिस्तान संघाने खळबळ माजवली आहे. अफगाणिस्तान संघाने तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरीसाठीच्या आपल्या अशा जिवंत ठेवल्या. मात्र, दुसरीकडे श्रीलंकेसाठी आता उपांत्य फेरीची दारे बंद होऊ लागली आहेत. अफगाणिस्तान संघाने श्रीलंकेचा पराभव करत थेट पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानलाही मागे टाकलेय. श्रीलंका संघ आता सहाव्या स्थानी घसरलाय. भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे.  


टॉप 4 ची स्थिती काय ?


पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेनं टॉप-4 मध्ये बदल करत अव्वल स्थान गाठलं होतं. पण आज टीम इंडियाने पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज केलेय. टीम इंडिया 12 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेने सहा सामन्यात पाच विजय मिळवले आहेत.  न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे.  ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचे समान गुण आहेत, पण न्यूझीलंड सरस रनरेटमुळे तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


इतर संघाची स्थिती काय ?


श्रीलंकेचा पराभव करत अफगाणिस्तानने गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. अफगाणिस्तान संघाने सहा सामन्यात तीन विजय मिळवलेत. सहा गुणांसह ते पाचव्या स्थानावर आहेत. पाचव्या क्रमांकावर असणारा श्रीलंका संघ सहाव्या स्थानी घसरलाय. श्रीलंका संघाचे सहा सामन्यात चार पराभव झालेत. सहाव्या क्रमांकवर असणारा पाकिस्तान आता सातव्या स्थानी घसरलाय. 
पाकिस्तान निगेटिव्ह -0.387 च्या नेट रनरेटसह 4 गुण मिळवत सातव्या,  नेदरलँडचा संघ चार गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. बांगलादेश निगेटिव्ह -1.338 च्या नेट रनरेटसह 2 गुण मिळवत नवव्या, इंग्लंड निगेटिव्ह -1.652 च्या खराब नेट रनरेटसह 2 गुण मिळवत दहाव्या क्रमांकावर आहे. 




अफगाणिस्तानचे विश्वचषकातील आव्हान जिवंत - 


आधी इंग्लंड, मग पाकिस्तान आणि आता श्रीलंका.... अफगाणिस्ताननं तीन बलाढ्य प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवून यंदाचा विश्वचषक गाजवला आहे. पुण्यातल्या एमसीए स्टेडियमवरच्या सामन्यात अफगाणिस्ताननं श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या प्रभावी आक्रमणासमोर श्रीलंकेचा अख्खा डाव २४१ धावांत आटोपला होता. अफगाणिस्तानकडून फाझल हक फारुखीनं चार आणि मुजीब उर रहमाननं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. अफगाणिस्तानचा रहमानउल्लाह गुरबाज भोपळाही फोडू शकला नाही. पण त्यानंतर अफगाणी फलंदाजांनी प्रत्येक विकेटसाठी भक्कम भागीदारी रचून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झादराननं ३९, रहमत शाहनं ६२, हशमत शाहिदीनं नाबाद ५८ आणि अझमत ओमरझाईनं नाबाद ७३ धावांची खेळी उभारली. अफगाणिस्ताननं तीन विजयांसह विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. तीन विजयासह अफगाणिस्तान संघाने सेमीफायनलचे आव्हान जिवंत ठेवलेय. पुढील तिन्ही सामन्यात अफगाणिस्तान संघाने विजय मिळवल्यास सेमीफायनलचे तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे.