Most wickets for India in World Cups : मोहम्मद शामीने यंदाच्या विश्वचषकात दोन सामन्यात नऊ विकेट घेऊन खळबळ माजवली आहे. शामीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंड आणि इंग्लंडचे फलंदाज सपशेल फेल ठरले. शामीने विश्वचषकातील 13 सामन्यात 40 विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. आतापर्यंत विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजात तो तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे, पण तो लवकरच नंबर एक स्थानावर पोहचण्याची शक्यता आहे. होय.. यंदाच्या विश्वचषकात मोहम्मद शामी मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे. शामीचा फॉर्म पाहता, मुंबईत श्रीलंकेविरोधातच हा विक्रम नावार होणार आहे. 
 
शामीच्या निशाण्यावर नंबर एक - 


विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात शामी तिसऱ्या क्रमांकावर आहे. शामीच्या आधी झहीर खान आणि जवागल श्रीनाथ हे दिग्गज गोलंदाज आहेत. शामीने 13 सामन्यात 40 विकेट घेतल्या आहेत. त्याला अव्वल स्थान गाठण्यासाठी फक्त पाच विकेटची गरज आहे. झहीर खान याने 23 सामन्यात 44 विकेट घेतल्या होत्या. शामी हा विक्रम 14 सामन्यात मोडण्याची शक्यता आहे. पाहूयात विश्वचषकात आघाडीचे पाच विकेट घेणारे गोलंदाज...
 
भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे आघाडीचे पाच गोलंदाज - 


1. झहीर खान (Zaheer khan) :


विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये झहीर खान पहिल्या स्थानावर आहे. 2011 च्या विश्वचषक विजयात झहीर खान याचा सिंहाचा वाटा होता. आयसीसीच्या महाकुंभामध्ये झहीर खान याने 23 सामन्यात 4.47 इकॉनॉमिनीने 44 विकेट घेतल्यात. झहीर खान याने विश्वचषकात 12 षटके निर्धाव फेकली अन् एक वेळा चार विकेट घेतल्या. 


 2. जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) : 


भारतीय संघाचा आघाडीचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. श्रीनाथने विश्वचषकाच्या 34 सामन्यात प्रतिनिधित्व केलेय.  जवागल श्रीनाथने 34 सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत. श्रीनाथने विश्वचषकात दोन वेळा चार विकेट घेतल्या आहेत. जवागल श्रीनाथने विश्वचषकात 21 षटके निर्धाव फेकली आहेत.


3. मोहम्मद शमी (Mohammed Shami) :


विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजामध्ये मोहम्मद शामी तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शामीने विश्वचषकाचे फक्त 13 सामने खेळले आहेत. या 13 सामन्यात शामीने 40 विकेट घेण्याचा भीमपराक्रम केला आहे. शामीने दोन वेळा पाच आणि चार वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. यंदाच्या विश्वचषकातही मोहम्मद शामीकडून दमदार कामगिरीची आपेक्षा असेल. अनुभवी मोहम्मद शामी भारतासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. 


 4. अनिल कुंबले (Anil Kumble) :


भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याचाही या यादीत समावेश आहे. अनिल कुंबळे याने विश्वचषकात भारतासाठी 18 सामने खेळले आहेत. या 18 सामन्यात 4.08 च्या अकॉनॉमीने 31 विकेट घेतल्या आहेत. 


5. कपिल देव (Kapil Dev) : 


कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने 1983 चा विश्वचषक उंचावला होता. बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत भारताने चषकावर नाव कोरले होते. या विजयात कपिल देव यांचा मोठा वाटा होता. कपिल देव यांनी विश्वचषकाच्या 26 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेय. कपिल देव यांनी 26 सामन्यात 28 विकेट घेतल्या आहेत. एकाच सामन्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रमही कपिल देव यांच्या नावावर आहे. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये कपिल देव पाचव्या क्रमांकावर आहेत.