लंडन : विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने धमाकेदार शतक साजरं केलं. रोहितच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 336 धावांचा डोंगर पाकिस्तानसमोर उभा केला. रोहितने या सामन्यात एका नव्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.


रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावे होता. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 531 सामन्यात 355 षटकार ठोकले आहेत. मात्र रोहितने केवळ 329 सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहितच्या नावावर आता 356 षटकार आहेत. रोहित, धोनीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव या लिस्टमध्ये आहे. सचिनने 664 सामन्यात 264 षटकार ठोकले आहेत.



आंतरराष्ट्रीय खेळाडुंमध्ये या यादीत वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. गेलच्या नावे 521 षटकार आहेत. तर दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, तर तिसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम आहे.


रोहितने अवघ्या 113 आपलं शतक साजरं केलं, यामध्ये 3 षटकार आणि 14 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धचं त्याचं हे दुसरं शतक होतं. याआधी त्याने 2015 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकलं होतं.