केनिंग्टन : विश्वचषकाच्या रणांगणात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघांमधील सामना ऑस्ट्रेलियाने 87 धावांनी जिंकला.  335 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने दमदार सुरुवात करुन देखील मधली फळी गडबडल्याने पराभवाचा सामना करावा लागला.


करुणरत्ने आणि परेरा यांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियासमोर तगडं आव्हान निर्माण केलं.  स्टार्कने परेराचा बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. परेराने 52 धावांची खेळी केली. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या फलंदाजांनी थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र मधल्या फळीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्याने श्रीलंकेच्या डावाची घसरगुंडी उडाली.

करुणरत्नेने एकाकी झुंज देत 97 धावा केल्या. त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने चार विकेट्स घेतल्या. तर केन रिचर्डसनने 2, पॅट कमिन्स 2 आणि जेसन बेहरनडॉर्फ 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेसमोर विजयासाठी 335 धावांचं आव्हान ठेवलं होतं. कर्णधार अॅरॉन फिंचचं खणखणीत शतक हे ऑस्ट्रेलियाच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. फिंचनं 132 चेंडूत 15 चौकार आणि पाच षटकारांसह 153 धावांची खेळी साकारली. त्याचं वन डे कारकीर्दीतलं हे चौदावं शतक ठरलं.

फिंचला माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथनंही 73 धावांची खेळी उभारुन त्याला छान साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत सात बाद 334 धावांची मजल मारता आली. श्रीलंकेकडून डिसील्वा, परेरा यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. लसिथ मलिंगाने एक बळी घेतला.