लंडन : रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या खणखणीत शतकांच्या जोरावर टीम इंडियानं श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा यंदाच्या विश्वचषकातला हा सातवा विजय ठरला. या सामन्यात श्रीलंकेनं टीम इंडियासमोर 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान टीम इंडियानं 44 व्या षटकांतच सात विकेट्स राखून पार केलं.
रोहित आणि राहुलनं सलामीच्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयाचा भक्कम पाया घातला. रोहितनं 94 चेंडूत 103 धावांची खेळी केली. तर राहुलने 111 धावा उभारल्या. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगा, कसून रजिथा आणि इसुरु उडाना यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
त्याथी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली, मात्र त्यानंतर अॅन्जेलो मॅथ्यूजचे आणि लहिरू थिरीमानेने श्रीलंकेची डाव सावरत संघाला 264 धावांपर्यंत मजल मारून दिली. अॅन्जेलो मॅथ्यूजचे 113 धावांची तर लहिरू थिरीमाने 53 धावांची खेळी केली.
भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
टीम इंडियाने याआधीच उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मात्र उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे अद्याप निश्चित झालं नसून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामन्याच्या विजेत्या संघावर ते ठरणार आहे.