साउदम्पटन : ज्यो रूटनं विश्वचषकातलं दुसरं शतक झळकावून इंग्लंडला वेस्ट इंडिजवर आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. इंग्लंडचा हा चार सामन्यांमधला तिसरा विजय ठरला. या सामन्यात विंडीजनं विजयासाठी दिलेलं 213 धावांचं आव्हान इंग्लंडनं 101 चेंडू राखून गाठलं.


सलामीच्या ज्यो रूटचं नाबाद शतक इंग्लंडच्या विजयात निर्णायक ठरलं. त्यानं 94 चेंडूंमधली नाबाद 100 धावांची खेळी अकरा चौकारांनी सजवली. रूटनं जॉनी बेअरस्टोच्या साथीनं 95 धावांची सलामी दिली. मग रूट आणि ख्रिस वोक्सनं दुसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी रचली.

रूटला जॉनी बेअरस्टो (45) आणि ख्रिस वोक्स (40) यांनी उत्तम साथ दिली. या तिघांच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. या विजयासह इंग्लंड विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

तत्पूर्वी, निकोलस पूरनचे अर्धशतक आणि ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर यांच्या  खेळीच्या बळावर विंडीजने कसाबसा 200 चा आकडा पार केला.  नाणेफेक जिंकून इंग्लंडच्या कर्णधाराने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय इंग्लंडच्या वेगवान माऱ्याने सार्थ ठरवला.

इंग्लंडकडून मार्क वुडने 18 धावांत 3 तर आर्चरने 30 धावांत 3 बळी घेतले.  रुटने 2 तर वोक्स आणि प्लंकेटने 1-1 गडी बाद केला.