लंडन : आयसीसी विश्वचषक स्पर्धेतला भारताचा तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत चार सामने पावसामुळे रद्द झाले आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाला असला तरी दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. रविवारी भारताचा मुकाबला पाकिस्तानशी होणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, एक खेळाडू म्हणून कालच्या सामन्याकडे पाहिलं तर, लक्षात येईल की, पावसामुळे मैदानाची विशेषतः खेळपट्टीची अवस्था वाईट झाली होती. ती खेळपट्टी सामना खेळण्यासाठी सुरक्षित नव्हती. विश्वचषक स्पर्धेत आम्हाला कोणत्याही सहकाऱ्याला जखमी झालेले पाहायचे नाही.

विराट म्हणाला की, आमचा संघ उत्तम खेळतोय. गुणतालिकेतल्या आमच्या स्थितीबाबत सध्या तरी आम्हाला चिंता नाही. सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यामुळे माझ्या सहकाऱ्यांमधला आत्मविश्वास वाढला आहे. अजून सराव केल्यानंतर, काही अभ्यास सत्रांनंतर सर्व काही ठिक होईल. आता आमचे संपूर्ण लक्ष पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर आहे. या सामन्यात आम्ही आमचे सर्वोत्तम प्रदर्शन करु.

भारताने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी सुरुवातीचे दोन सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पाच गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे.