मुंबई : शाय होप आणि जेसन होल्डरच्या झुंजार अर्धशतकांनंतरही वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 289 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला 50 षटकांत नऊ बाद 273 धावांचीच मजल मारता आली.


विंडीजकडून शाय होपने 68 तर होल्डरने 51 धावांची खेळी साकारली. पण विंडीजच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी रचण्यात अपयश आलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने भेदक मारा करताना पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर पॅट कमिन्सने दोन विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाचा गेल्या दहा वन डे सामन्यांतला हा सलग दहावा विजय ठरला.

स्टीव्ह स्मिथ आणि नॅथन कूल्टर नाईलच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 289 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विंडीजच्या भेदक आक्रमणासमोर ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांनी लोटांगण घातलं होतं. ऑस्ट्रेलियाची 16 षटकांत पाच बाद 79 अशी दाणादाण उडाली होती. पण स्टीव्ह स्मिथने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.

स्मिथने सात चौकारांसह 73 धावांची खेळी केली. आठव्या क्रमांकावर आलेल्या कूल्टर नाईलने 60 चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांसह 92 धावा कुटल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सर्व बाद 288 धावांची मजल मारता आली.