मुंबई : विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्या येत्या 9 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. या सामना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन यांच्यासाठी खास असणार आहे. कारण 11 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे विराट आणि विल्यमसन एकमेकांशी भिडले होते.
अकरा वर्षांपूर्वी 2008 मध्ये अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातही भारत-न्यूझीलंड यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी विराट कोहली भारताचा कर्णधार होता आणि केन विल्यमसन न्यूझीलंडचा कर्णधार होता. तो सामना विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने तीन गडी जिंकला होता. याच सामन्याची पुनरावृत्ती 9 जुलैला व्हावी अशी प्रत्येक भारतीय चाहत्याची इच्छा आहे.
येत्या 9 जुलै रोजी विराट आणि विल्यमसनचा अंडर-19 विश्वचषकानंतर पुन्हा एकदा विश्वचषकात आपआपल्या संघाला विजयी करण्यासाठी कर्णधाराच्या भूमिकेत एकमेकांशी भिडणार आहेत.
विश्वचषकातील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर अखेर पावसानं पाणी फेरलं होतं. या सामन्यात पावसाची संततधार आणि ओलं मैदान यामुळे एकाही चेंडू खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदा एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.