India vs Sri Lanka Women's Asia Cup 2022 : महिला आशिया चषक स्पर्धेला आजपासून बांग्लादेशमध्ये सुरुवात झाली आहे. बांग्लादेशच्या एसआयसीएस ग्राऊंड 2 (SICS Ground 2) येथे भारतीय महिलांनी सलामीचा सामना खेळला. या सामन्यात भारतीय महिलांनी श्रीलंका संघावर (India vs Sri Lanka) 41 धावांनी विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. 1 ऑक्टोबरपासून 15 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार असून भारतीय महिलांचा फॉर्म दमदार असल्याने त्यांच्याकडून सर्वांनाच अपेक्षा आहेत.
सामन्यात सर्वात आधी श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिलांना कमी धावांत रोखून संबधित लक्ष्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्लॅन श्रीलंका संघाचा होता. त्यांनी गोलंदाजीची सुरुवातही चांगली केली. भारताच्या सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना अनुक्रमे 10 आणि 6 धावा करुन तंबूत परतल्या. त्यानंतर युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्जने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत मिळून एक चांगली भागिदारी रचली. 33 धावा करुन कौर बाद झाली. पण जेमिमाने आपली झुंज कायम ठेवली. उर्वरीत फलंदाजांनी खास साथ दिली नसली तरी जेमिमाने 76 धावांची दमदार खेळी खेळत भारताची धावसंख्या पुढेपर्यंत नेली. भारताने 151 धावांचे लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवले.
151 धाव करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघावर भारताने सुरुवातीपासून दबाव कायम ठेवला. हर्षिता मडवी 26 आणि हसिनी परेराच्या 30 धावा सोडल्या तर इतर श्रीलंकन महिलांना खास कामगिरी करता आली नाही. भारतीय महिलांनी मात्र आपली भेदक गोलंदाजी अखेरपर्यंत सुरु ठेवत श्रीलंकेला 18.2 षटकात 109 धावांवर सर्वबाद केलं. भारतासाठी दयालन हेमलथाने 3, पुजा वस्त्रकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर राधा यादवने 1 विकेट घेतली. भारतासाठी 76 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या जेमिमाला प्लेअर ऑफ द मॅचने पुरस्कृत करण्यात आलं.