IND vs THAI, Women Asia Cup 2022 : सध्या बांग्लादेश येथे सुरु असलेल्या महिला आशिया चषकात (Womens Asia Cup 2022) भारतीय महिलांनी जबरदस्त कामगिरी सुरु ठेवली आहे. त्यांनी नुकत्याच थायलंडविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट खेळी करत 9 विकेटेसने विजय मिळवला. विशेष म्हणजे सामन्यात अप्रतिम गोलंदाजीचं दर्शन भारतानं घडवलं. थायलंड संघाला अवघ्या 37 धावांत रोखून 38 धावांचं आव्हान एका विकेट्च्या बदल्यात भारतानं पूर्ण केलं.


महिला आशिया चषकातील आजच्या 19 व्या सामन्यात भारतीय महिला संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर थायलंडनं (India Women vs Thailand Women) लोटांगण घातलं. शेल्हेट आंतराष्ट्रीय स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं थायलंडला 9 विकेट्सनी पराभूत केलं.  या सामन्यात स्मृती मानधना भारतीय संघाचं नेतृत्व करत होती. तिने नाणेफेक जिंकून थायलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलवलं. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय अगदी योग्य असल्याचं दाखवून देत सुरुवातीपासूनच थायलंडच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. थायलंडच्या 9 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कोंचरोंकाईने सर्वाधिक 12 धावा केल्या. संपूर्ण संघ 15.1 षटकात 37 धावांत सर्वबाद झाला. यावेळी भारताकडून स्नेह राणाने 9 धावांत 3 बळी घेतले. दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाडने 2-2 तर मेघना सिंहला एक विकेट मिळाली. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारतीय संघाने सहज केला. शेफाली वर्मा (8), एस मेघना (20) आणि पूजा वस्त्राकर (12) यांनी हे लक्ष्य पूर्ण करत विजय मिळवला. यावेळी स्नेह राणाला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आलं.




सेमीफायनलमध्ये टीम इंडिया


या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत अर्थात सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. भारतीय संघाने साखळी टप्प्यातील 6 सामन्यांतील 5 सामने जिंकत 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. सोबतच उपांत्य फेरीत प्रवेशही केला आहे. भारताला स्पर्धेत केवळ एकमेव तो देखील पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला आहे. दरम्यान आता भारत सेमीफायलनमध्ये पोहोचला आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका संघही उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.  


हे देखील वाचा-