ENG vs IND T20 Series: एकदिवसीय आणि टी-10 क्रिकेटमध्ये कधीकाळी बादशाह असलेला भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. विराट मागील अडीच वर्षांपासून एक-एक धाव जमा करण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. त्यामुळं येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात विराट खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इंग्लंडविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या टी-20 मालिकेनंतर विराटचं भवितव्य ठरणार आहे.
विराट कोहलीची धावांसाठी धडपड
विराट कोहलीला गेल्या अडीच वर्षांत तिन्ही फॉरमेटमध्ये एकही शतक झळकावता आलं नाहीये. कोहलीनं त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा टी-20 सामना श्रीलंकाविरुद्ध यावर्षी फेब्रुवारीमध्ये खेळला होता. त्यानंतर आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी त्यानं विश्रांती घेतली. विशेष म्हणजे, आयपीएलमध्येही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आयपीएल 2022 मध्ये एकूण 16 सामन्यात फक्त 341 धावा केल्या. दरम्यान, टी-20 विश्वचषकाला काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. यामुळं विराट कोहलीचं फॉर्ममध्ये येणं भारतीय संघासाठी खूप गरजेचं आहे.
आयसीसी कसोटी क्रमावारीच्या टॉप-10 मधून विराट बाहेर
आयसीसीनं नुकतीच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजाच्या क्रमावारीच्या टॉप-10 मधून विराट कोहली बाहेर पडलाय. तब्बल सहा वर्षानंतर विराट कोहली टॉ-10 मधून बाहेर पडलाय. इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या रिशेड्युल कसोटी सामन्यातही तो मोठी धावसंख्या करण्यास अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात विराट कोहलीला पहिल्या डावात 11 तर, दुसऱ्या डावात 20 धावा करता आल्या. परिणामी, आयसीसी कसोटी क्रमवारीत त्याची तीन स्थानांनी घसरण झाली असून तो सध्या 13 व्या स्थानावर पोहचलाय.
ऑस्ट्रेलियात रंगणार आगामी टी-20 विश्वचषक
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-
- IND-W vs SL-W, 3rd ODI: भारताच्या पोरी एक नंबर, श्रीलंकेला क्लीन स्विप, एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली
- ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध पहिला टी-20 सामना आज! रोहित शर्मा, विराट कोहलीच्या कामगिरीवर असेल सर्वांचं लक्ष
- Happy Birtday MS Dhoni: शून्यापासून करिअरची सुरुवात, आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार, धोनीच्या संबंधित 41 रंजक गोष्टी